अभिजात शास्त्रीय संगीताचा परिपूर्ण आनंद देणाऱ्या पाच दिवसांच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’स बुधवारपासून (७ डिसेंबर) प्रारंभ होत असून या स्वरयज्ञात आपल्या श्रवणभक्तीची समीधा अर्पण करण्यासाठी संगीतप्रेमी रसिक उत्सुक झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावरील भव्य मंडपामध्ये मंगळवारी महोत्सवाची तयारीची चाचणी घेण्यात आली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा बुधवारी उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनईवादनाने श्रीगणेशा होणार आहे. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि पद्मा तळवलकर यांच्या शिष्या गौरी पाठारे यांचे गायन

होईल. इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरत खान यांचे चिरंजीव-शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे ‘सूरबहार’ या सतारीशी मिळत्या-जुळत्या वाद्याचे सादरीकरण होणार असून किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. गणपती भट यांच्या मैफिलीने महोत्सवातील पहिल्या सत्राची सांगता होणार आहे. ज्येष्ठ शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून यंदाच्या महोत्सवातील पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात आला आहे. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर ८० हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला असून लाल आणि पांढऱ्या कापडाने मंडपाची सजावट करण्यात आली आहे.

यामध्ये ८ ते १० हजार रसिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वरमंचावरून सादर होणाऱ्या गायन-वादन मैफिलीचा आवाज रसिकांना सुस्पष्टपणे ऐकू यावा यासाठी लाईन आरे-स्पीकर्ससह २६ ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्वरमंचावरील कलाकारांच्या गानमुद्रा श्रोत्यांना दिसाव्यात या उद्देशातून सहा ‘एलईडी वॉल’ उभारण्यात आल्या असल्याचे ‘स्वरांजली’चे प्रदीप माळी यांनी सांगितले. रसिकांच्या सोयीसाठी रानडे बालक मंदिर आणि नदीपात्रातील रस्ता येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. रसिकांच्या सोयीसाठी ‘पीएमपीएमएल’ प्रशासनातर्फे रमणबाग प्रशाला येथून कात्रज, धायरी, कोथरूड आणि कर्वेनगर येथे जाण्यासाठी विशेष बससेवा देण्यात आली आहे.

महोत्सवात आज

एस. बल्लेश आणि कृष्णा बल्लेश (सनई)

गौरी पाठारे (गायन)

उस्ताद इर्शाद खान (सूरबहारवादन)

पं. गणपती भट (गायन)