पारंपरिक चित्रपटातल्या नायक-नायिकेचे आदीम स्वप्न हे त्यांना आणि त्यांच्या प्रेमाला विरोध न करणाऱ्या जगाचे असते. पण एकाच वेळी नायिकेचे प्रेम हस्तगत करायला निघालेला किंवा नायकाला पाण्यात पाहणारा खलनायक वा उपखलनायक नसेल, तर चित्रपटाच्या कथानकाला जोर येत नाही, ही शिकवण बॉलीवूडच्या धाटणीबाज चित्रपटांनी आपल्या मेंदूत जतन करून तिला उत्तरोत्तर संवर्धित केली. आपली चित्रबैठक ही ज्या संकल्पनांनी मजबूत झाली, त्यातून सिनेमाच्या ढोबळ रचनेपलीकडच्या सिनेमांना प्रेक्षकांनी कधीच स्वीकारले नाही. परिणामी नवसमांतर आर्टफिल्म्समधील सारेच भारतीय इंग्रजी चित्रपट (बाम्बे बॉइज, बिइंग सायरस, इंग्लिश ऑगस्ट) तिकीटबारीवर कोसळले किंवा विस्मृतीत गेले. याच काळात बोमन इरानी अभिनीत ‘लेट्स टॉक’ (२००२) हा केवळ नवरा-बायकोंमधील आत्मिक संघर्षसंवाद दर्शविणारा चित्रपट फेस्टिवल वर्तुळापूरता गाजला होता. निव्वळ दीड-दोन तास दोन पात्रांच्या उकळत्या जगण्याचे संदर्भ सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी तेव्हा ‘बाऊन्सर’ पलिकडे होते. आजही त्यात फार बदल झालेला नाही. फक्त व्यावसायिक कलाकारांनी आर्ट फिल्म्सच्या वाटेवर जाऊन काही केले की मग ‘फारच वेगळा’ म्हणत, त्या चित्रपटांचा अन्वयार्थ शोधताना प्रेक्षक गोंधळतात. उदा. ‘जब वी मेट’ पासून दिग्दर्शक इम्तियाज अली एकच गोष्ट चलाखीने सांगत असल्याचे सर्वाना स्पष्ट होत नाही. त्या सिनेमांत नायक-नायिकांच्या गोतावळ्यामध्ये खलनायक नसल्याची एकच बाब आपल्या मनावर वेगळेपणाची खूण बिंबवते. पण इथल्या लग्नपटांमध्ये प्रचंड मोठा गोतावळा असतानाही नायक आणि नायिका यांच्यापलीकडे चित्रपटातून आपला मेंदू कुणाला म्हणजे कुणालाच महत्त्व देत नाही.

चित्रपटात केवळ नायक-नायिका यांच्याशिवाय कुणीही न दाखविणारे संवादी चित्रपट अमेरिकी इंडिपेण्डण्ट चित्रपटात कमी नाहीत. रिचर्ड लिंकलेटरच्या ‘बिफोर सनराइझ- बिफोर सनसेट’ मालिकेपासून अशा चित्रपटांची संख्या वाढती झाली आहे. या रोमॅण्टिक चित्रपटांत दोन व्यक्तींचा परस्परांशी वाढत जाणारा सुसंवाद हा महत्त्वाचा घटक आहे. ‘बोका’ हा नुकताच आलेला विज्ञान चित्रपट याच पंथातील आहे. फक्त त्यात खूप जवळीक झाल्यानंतर दोन व्यक्तींचा एकमेकांशी वाढत जाणारा असंवाद केंद्रस्थानी आहे.

‘बोका’ (उच्चार बोकेह देखील होतो) ही संकल्पना फोटोग्राफीमध्ये वापरली जाते. यात सौंदर्याचा भाग म्हणून दाखवायची गोष्ट ठळक करून त्याचा भोवताल संपूर्णपणे ब्लर केला जातो. पटकथाकार-दिग्दर्शक जॉफ्री ऑर्टवेन आणि अ‍ॅण्ड्रय़ू सुलिव्हन यांनी नायक आणि नायिका यांचे जग ठळक करून इतर जगाला इथे ब्लर करून टाकले आहे. म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला नायक रायले (मॅट ओ‘लिअरी) आणि नायिका जेनाय (माइका मोन्रो) हे दोघे अमेरिकी जोडपे आइसलॅण्डमध्ये भटकंतीसाठी दाखल होतात. रायले हा फोटोग्राफर असल्याने तिथल्या निसर्गसंपदेतील सूक्ष्म बाबींना छायाचित्रात टिपत ते दोघे इतर पर्यटकांसोबत वावरतात. भटकून दमल्यावर हॉटेलमध्ये परततात. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते ती त्या दोघांखेरीज जगात कोणीही उरलेले नसल्याची जाणीव त्यांना देऊन. गूढपणे आइसलॅण्डमधील रस्ते, सार्वजनिक जागा ते राहत असलेले हॉटेल मानवरहित बनून जाते. दु:स्वप्न पडल्यासारखे ते दोघे शहरभर या विचित्र घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. टीव्हीवरून,दूरध्वनी-मोबाइलवरून, इंटरनेटवरून इतर जगाशी संपर्क करू पाहतात. पण या कोणत्याही माध्यमाद्वारे पृथ्वीवर इतर कुणी शिल्लक असल्याचा मागमूस त्यांना लागत नाही. कोणताही ओरखडा किंवा खूण मागे न ठेवता माणसे गायब झालेल्या जगाला स्वीकारल्यानंतर ते जे काही करतात, त्याचा एकंदरीत परिणाम मोठा आहे.

ते सुरुवातीला सापडेल ते वाहन घेऊन माणसांच्या शोधार्थ दूरवरची भटकंती करतात. मॉलमध्ये अतिरिक्त वस्तूंचा भरणा करीत आवडेल त्या घरात मुक्काम करतात. समाज आणि कसलाच अडथळा नसलेल्या गोष्टींचा अतिरेकी उपभोग घेऊन झाल्यानंतर कंटाळू लागतात. त्यांना एका खेडय़ात मरणपंथाला टेकलेला म्हातारा भेटतो. तो त्यांच्या भेटीनंतर मृत्युमुखी पडतो. रायले या जगातही स्वत:ला जुळवून घेतो. जेनायची मात्र धुसफूस सुरू होते. अद्याप जिवंत असलेल्या माणसांचा शोध घेण्याचा उपक्रम ती थकेपर्यंत राबविते.

चित्रपट मानवी आयुष्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भरपूर चर्चा करतो. आयुष्याचा अर्थ काय, माणसाचे समाजशील जगणे म्हणजे काय, दोन व्यक्ती खरोखरीच एकमेकांसाठी बनल्या असतात का, लग्नसंस्था आणि इतर सामाजिक संस्थांची व्यक्तीला गरज असते, की ती थोतांड कल्पना आहे, अशा अनेक सनातन प्रश्नांचा या दोघांकडून शोध घेतला जातो.

दोघे आपापल्या परीने एकत्र राहून एकमेकांना जपण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्यावर लादलेला एकांतच परिस्थिती सरळ ठेवत नाही. चित्रपट दृश्यश्रीमंत आहे तरी अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले जात नाही. पण चित्रपटाला जे सांगायचे, ते ठळक नक्कीच झाले आहे. नायक नायकांचे एकांताचे आदिम स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नक्की काय घडू शकते, हे पाहण्यासाठी ‘बोका’ चित्रपटातील द्विपात्री अभिनव नाटय़ आदर्श उदाहरण आहे. कलात्मक चित्रपटाविषयीची मानसिकता दूर करून आपल्या ठोकळेबाज चित्रदृष्टीची घुसळण करण्याची क्षमता त्यात आहे.