अ‍ॅण्टोनिओ बॅण्डरस या स्पॅनिश अभिनेत्याची कारकीर्द सुरू झाली दिग्दर्शक प्रेडो अल्माडोर याच्या कलात्मक सिनेमांमधून. परंतु त्याचा नावलौकिक झाला हॉलीवूडच्या अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटांमधून. डेस्परेडो, मार्क ऑफ झोरो या सिनेमांनी त्याला नव्वदीतील ब्रूस विलीस, व्ॉन डॅम, अरनॉल्ड श्वात्झनेगर यांच्या अ‍ॅक्शनहिरोंच्या पंगतीत नेले. त्याच्या चित्रपटांतील गिटार अस्त्र (वन्स अपॉन अ टाइम इन मेक्सिको, डेस्परेडो) तलवारबाजीच्या करामती (झोरो) आणि अस्पष्टोच्चारयुक्त इंग्रजी या वैशिष्टय़ांना सहसा विसरता येणार नाही. वृद्धत्वाकडे झुकलेला हा अभिनेता मध्यंतरी पुन्हा कलात्मक आणि बी ग्रेड अ‍ॅक्शनपटांमध्ये रमला होता. तीनेक वर्षांपूर्वी आलेला त्याचा ‘अ‍ॅटोमॅटा’ हा बरा चित्रपट फारसा लोकप्रिय बनू शकला नाही. नुकताच आलेला त्याचा ‘सिक्युरिटी’ हा जुन्या धाटणीचा अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा त्याच्या अलीकडच्या सर्व भूमिकांमधील उजवा ठरावा. रिडले-टोनी स्कॉट, लूक बेसन प्रभृतींमुळे आज अतिवेगवान झालेल्या अ‍ॅक्शन सिनेमांच्या एक्स्प्रेसमध्ये हा चित्रपट वेगळा पूर्णपणे वेगळा म्हणून आवडू शकेल.

‘सिक्युरिटी’ची जुनी धाटणी ही नव्वदीच्या अ‍ॅक्शन सिनेमांसमान आहे, ज्यात येणाऱ्या अजस्र अडचणींवर सामान्य अवस्थेतील नायक अचानक परिस्थिती हाताळण्याच्या भूमिकेत शिरतो. ब्रुस विलीस आणि वॅन डॅमच्या दरेक चित्रपटांत हिंसक आणि समाजविघातक खलनायकांची फौज विरुद्ध एकटा नायक अशी लढाई असे. (अशी लढाई धर्मेंद्र ते मिथुन आणि अक्षय कुमार ते सलमान खानच्या बॉलीवूडी अवतारांत सदैव गमतीशीर वाटते.) आता जेसन स्टेथम, विन डिझेल, रॉक यांचे अ‍ॅक्शन सिनेमेदेखील एकखांबी तंबूसारखे असले तरी ‘सिक्युरिटी’इतका भाबडेपणा त्यात नसतो. भावनाशून्य रोबोटिक आणि व्हिडीओगेमसदृश हाणामारी सुरुवातीपासून शेवटापर्यंत दाखविली जाणे चित्रकर्त्यांवर आणि त्या वेगातच नरपुंगवाचे रोमॅण्टिक रूप शोधणे प्रेक्षकांवर बंधनकारक असते.

सिक्युरिटीमधला नायक एडी (बॅण्डरस) हा फारच सामान्य अवतारातला आहे. लष्करातून कॅप्टनपदावरून निवृत्त झाल्यानंतर तो नोकरीच्या शोधात आहे. मंदीच्या काळात नोकरी दुरापास्त झाल्याने त्याच्या वकुबानुसार त्याला नोकरी मिळत नाही. दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या पत्नी आणि मुलीच्या भवितव्यासाठी त्याला त्रोटक मोबदल्याची मिळेल ती नोकरी तो स्वीकारतो. एका अवाढव्य मॉलच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात त्याचा समावेश होतो.

मॉलमध्ये सुरक्षा रक्षकाचा गणवेश एडीवर चढण्याआधीच शहरामध्ये क्रूरकम्र्या गँगस्टरची टोळी आपल्याविरोधील एका प्रचंड मोठय़ा खटल्यातील साक्षीदार असलेल्या लहान मुलीचा खात्मा करण्यासाठी सक्रिय झालेली दिसते. या मुलीला दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये सुरक्षितरीत्या नेणाऱ्या पोलिसांच्या संपूर्ण ताफ्याला ठार मारते. त्या झटापटीत साक्षीदार मुलगी पळ काढते आणि एडी कामास रुजू झालेल्या मॉलमध्ये शिरकाव करते. टोळीचा म्होरक्या चार्ली (बेन किंग्जले) मॉलमध्ये आश्रयास असलेल्या मुलीच्या मोबदल्यात एडीसह पाचही सुरक्षा रक्षकांना भरघोस रकमेचे आश्वासन देतो. इथे सामान्य एडीमधला लष्करी कॅप्टन जागा होतो. परिस्थिती ताब्यात घेऊन तो गँगस्टरची मुलीविना पाठवणी करतो. यानंतर चार्ली आपल्या शस्त्रसज्ज सैन्यासह या सुरक्षारक्षकांना टिपण्यासाठी दाखल होतो. मॉलमध्ये युद्धगोल रचून तो या तुलनेने चिमुकल्या वाटणाऱ्या सुरक्षारक्षकांना क्षणात चिरडून टाकेल, या भ्रमात असतो. पण एडी आपली सर्व कौशल्ये आणि अल्पसंख्येतील सहकाऱ्यांना घेऊन या युद्धाला लढण्यासाठी सज्ज होतो.

चित्रपटात आकर्षक आणि नावीन्यपूर्ण क्लृप्त्या नाहीत. एडी सोडून सारे सुरक्षारक्षक यथातथा रक्षण कौशल्य असलेली पापभीरू माणसे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून एडीला मिळणारे साहाय्य तोकडय़ा स्वरूपाचे ठरते. येथील गंमत म्हणजे मॉलमध्ये दाखल झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच सारे या नवख्या कर्मचाऱ्याला आपला नेता बनवून टाकतात आणि तो देखील जणू ‘याचसाठी आलो आपण’ थाटात युद्धभूमीचे डावपेच मॉॅलमध्ये आखायला लागतो.

आवाढव्य मॉलमधील देखणी लढाई ज्यांना पाहायची असेल, त्यांनी हाँगकाँगच्या जॉनी टो या दिग्दर्शकाच्या ‘मिशन’ (१९९९) या चित्रपटाला पाहावे. चित्रपटाच्या भल्या मोठय़ा एका भागात मॉलमधील यंत्रणांचा पुरेपूर वापर करून येथे दोन गँगस्टर टोळ्यांची देखणी हाणामारी दाखविण्यात आली आहे. त्यात मॉलदेखील एखाद्या व्यक्तिरेखेसारखा भासेल अशी रचना करण्यात आली आहे. ‘सिक्युरिटी’मध्ये मॉलमधील यंत्रणेचा पुरेपूर वापर केलेला दिसत नाही. कारण इथे नायक अ‍ॅण्टोनिओ बॅण्डरस याच्या अ‍ॅक्शन करामतींना सर्वाधिक वाव द्यायचा आहे. एकेकाळी प्रचंड अ‍ॅक्शनकरिश्मा असलेल्या या नायकाची वृद्धापकाळ निकट आला असताना होणारी घोडदौड आणि हाणामारीचा वेग पाहण्यासारखा आहे. आपल्या जुन्या सिनेमांतल्या भूमिकांइतकीच कौशल्यक्षमता त्याने पणाला लावली आहे. शिवाय इथल्या हाणामारीत कृत्रिमता-यांत्रिकता जाणवत नााही. आजच्या खूप वेगाने भरलेल्या व्हिडीओगेमसदृश अ‍ॅक्शनपॅक्ट सिनेमांच्या गर्दीत म्हणूनच या चित्रपटाला पाहणीयता प्राप्त झाली आहे.