मराठी रंगमंचावर सध्या तुफान गाजत असलेले नाटक म्हणजे सेल्फी. सेल्फी लवकरच १२५ प्रयोगांकडे वाटचाल करत आहे. शिल्पा नवलकर लिखित सेल्फी या नाटकाचा विषय लोकांना एवढा आवडला की हे नाटक एप्रिलमध्ये हिंदी रंगभूमीवरही आले. परितोष पेन्टर यांनी हिंदी नाटकाचे दिग्दर्शन केले असून रुपा गांगुली, दीपशिखा, लकी मोरानी, मधुरिमा निगम, उर्वशी शर्मा जोशी यांनी या नाटकात काम केले आहे.
या नाटकाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेल्फी आता इंग्रजीमध्येही येणार आहे. पारितोष पेन्टरने शिल्पा नवलकरकडून सेल्फीचे हिंदी आणि इंग्रजीचे अधिकार घेतले आहेत. इंग्रजी नाटकाचे दिग्दर्शन तनाझ इरानीने केले असून, नाटकाची निर्मिती पारितोष पेन्टर यांनी केले आहे. यात तनाझ इरानी, डिंपल शहा, श्वेता गुलाटी, प्रिया मलिक आणि किश्वर मर्चंड या पाच जणी काम करणार आहेत. तिन्ही भाषांचा प्रेक्षक जरी वेगळा असला तरी मूळ विषय दमदार असल्यामुळे कोणत्याही भाषेमधल्या प्रेक्षकांना सेल्फी आवडेलच.
‘इंग्रजी नाटकासाठी जॉय सिंग गुप्ता यांनी भाषांतर केले आहे. इंग्रजी भाषेतही हे नाटक येतंय याचा मला आनंदच होत आहे. प्रत्येक व्यक्तीने बघावं असं हे नाटक आहे. मराठीमध्येही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजित भुरेने दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे महिनाभर अमेरिकेत प्रयोग झाले, तर आता सव्वाशे प्रयोगांकडे आम्ही वाटचाल करत आहोत,’ असे सेल्फीच्या लेखिका शिल्पा नवलकर म्हणाल्या.