वयाच्या सातव्या वर्षी (इयत्ता दुसरी) शाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाळेत एक नाटक बसवायचे होते.

‘अरे तू नाहीतरी नुसता हुंदडत असतोस, मस्ती करतोस तर नाटकात काम कर’ असे शाळेतील आरोदेकर मास्तरांनी ‘त्या’ मुलाला सांगितले. ‘छे, छे हे नाटक-बिटक मला नाही जमायचे’ असे उत्तर ‘त्या’ मुलाने देताच आरोदेकर मास्तरांनी त्याचे तोंड ‘रंगविले’. अखेर ‘त्या’ मुलाने नाटकात काम करायला होकार दिला आणि  ‘खोडकर बंडू’ या नाटकात काम केले. तेव्हापासून ‘त्या’ मुलाच्या तोंडाला जो रंग लागला तो कायमचाच.. मास्तरांचा मार खाणाऱ्या ‘त्या’ मुलाने पुढे रंगभूमी हेच आपले दैवत मानले आणि नोकरी सांभाळून आयुष्यभर ‘कलावंत कार्यकर्ता’ म्हणून काम केले. तो ‘मुलगा’ आता ८६ वर्षांचा असून ते आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर..

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

सुखटणकर मूळचे गोव्याचे. माशेल हे त्यांचे गाव. त्यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली. ‘बर्मा शेल’मध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाले, पण वैद्यकीय चाचणीत कमी वजन भरल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. बॅलार्डपिअर येथून चर्चगेटला चालत निघाले असताना मुंबईत राहून काय करायचे, पुन्हा गोव्याला जाऊ या असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. फ्लोरा फाउंटनजवळ (आत्ताचा हुतात्मा चौक) ते आले असता एक गाडी थांबली. गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व  त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले. ‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली. येथे ‘टंकलेखक’ म्हणून सुमारे सहा महिने त्यांनी नोकरी केली. १ एप्रिल १९५१ मध्ये ‘ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून लागले आणि ३० नोव्हेंबर १९९० मध्ये महामंडळाच्या सेवेतून ‘प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून निवृत्त झाले.

नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले. महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, महाविद्यालयात प्रवेश घेताना माझ्या मागे ‘बलराज दत्त’ हा धिप्पाड मुलगा उभा होता. आम्ही दोघांनीही नंतर महाविद्यालयाच्या तसेच महाविद्यालयीन पातळीवरील नाटय़ स्पर्धामधून काम केले. तो मुलगा पुढे ‘सुनील दत्त’ म्हणून प्रसिद्ध झाला. प्रा. चारुशीला गुप्ते या मराठी विभागाच्या प्रमुख होत्या. नाटक बसविण्यात त्यांचा पुढाकार असायचा. ‘लग्नाची बेडी’ हे नाटक केले. यात मी ‘गोकर्ण’ची भूमिका केली. माझ्याबरोबर आत्माराम भेंडे, आशालता भेंडे, बबन प्रभू, रमेश चौधरी ही मंडळी होती. भारतीय विद्या भवनच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ‘भाऊबंदकी’ नाटक सादर केले. याचे दिग्दर्शन अभिनेते रामचंद्र वर्दे यांचे होते. ‘वेडय़ाचा चौकोन’ हे नाटकही केले. त्यात माझी नायिका इंदुमती शेठ ही मुलगी होती. पुढे ती इंदुमती पैंगणकर तथा कानन कौशल म्हणून प्रसिद्ध झाली.

सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. त्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धा सुरू झाली तेव्हा ‘धि गोवा हिंदूू असोसिएशन’ने सादर केलेल्या ‘खडाष्टक’ नाटकाला पहिले बक्षीस मिळाले होते. मा. दत्ताराम यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी ‘आयएनटी’ने सादर केलेल्या ‘अशीच एक रात्र येते’ या नाटकासाठी मला वैयक्तिक अभिनयाचे पारितोषिक मिळाले. हे नाटक पाहण्यासाठी ‘धि गोवा हिंदूू असोसिएशन’ची काही मंडळी आली होती. माझे काम पाहून त्यांनी मला त्यांच्या संस्थेत काम करण्यासाठी बोलाविले आणि १९५८ मध्ये मी ‘गोवा हिंदूू’मध्ये कलाकार म्हणून प्रवेश केला. संस्थेच्या ‘संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘मृच्छकटीक’, ‘होनाजी बाळा’ आदी नाटकांतून काम केले. रामकृष्ण नायक व अवधूत गुडे हे दोन कार्यकर्ते संस्थेसाठी अत्यंत तळमळीने काम करायचे. कार्यकर्ता कसा असावा याचा ते आदर्श वस्तुपाठ होते. त्यांच्याकडे पाहून ‘कलाकार’ म्हणून नव्हे तर ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करायचे मीठरविले. त्यामुळे नव्या नाटकात कलाकारांची निवड करण्याची चर्चा व्हायची तेव्हा ‘मी अमुक भूमिका करेन’ असे सांगणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे संस्थेतर्फे सादर झालेल्या अनेक नाटकांच्या पहिल्या प्रयोगापासून मला काम करता आले नाही. अर्थात काही नाटके याला अपवाद ठरली. पुढे काही पेचप्रसंग निर्माण झाला तेव्हा संस्थेच्या बहुतांश नाटकांतून मी भूमिका केल्या. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘नटसम्राट’, ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’ आणि इतर ‘मैलाचा दगड’ ठरतील अशा नाटकांमधून मी ‘कलाकार’ म्हणून उभा राहिलो आणि नाटकाचा प्रयोग रद्द झाला असे कधीही होऊ दिले नाही. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील ‘शिवाजी’ महाराज वगळता सर्व भूमिका केल्या. एकदा ऐनवेळी ‘संभाजी’ साकारला. ‘नटसम्राट’ नाटकातील ‘आप्पासाहेब बेलवलकर’ वगळता सर्व भूमिका केल्या. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले या सगळ्या ‘नटसम्राटां’बरोबर काम केले. ‘मत्स्यगंधा’ नाटकाचे सुरुवातीचे प्रयोग अपयशी ठरले. गोव्यात काही प्रयोग करून आम्ही हे नाटक बंद करणार होतो. गोव्याच्या प्रयोगाला ‘चंडोल’चे काम करणारा कलाकार मुंबईहून येऊ शकणार नसल्याने ऐनवेळी मी उभा राहिलो. गोव्यातील प्रेक्षकांकडून या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुढे ते नाटक चालायला लागले. पुढे सर्व प्रयोगांत ‘चंडोल’ साकारला. ‘लेकुरे उदंड झाली’मधील ‘दासोपंत’ ही भूमिका सुरुवातीला विठ्ठल पणदूरकर करत होते. काही कारणाने त्यांना काम करणे शक्य होणार नसल्याने नाटकातील ‘दासोपंत’ही साकारला. ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘एकच प्याला’ आदी नाटकांतूनही भूमिका केल्या. बर्लिन महोत्सवासाठी ‘हयवदन’ नाटक मी केले. ‘गोवा हिंदूू’च्या विविध नाटकांचे सुमारे अडीच ते तीन हजार प्रयोग आजपर्यंत मी केले आहेत. संस्थेसाठी ‘कार्यकर्ता’ असल्याने सादर झालेल्या प्रयोगांसाठी मानधन घेणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे कोणतेही मानधन न घेता मी हे सर्व प्रयोग केले.

नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदूी मालिका. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत ते फारसे रमले नाहीत. रंगभूमीवर कामाचा जिवंत अनुभव घेतल्यामुळे मालिकांमध्ये रस वाटला नसल्याचे ते सांगतात. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. शिरवाडकर यांचे मोठे ऋण आपल्यावर असल्याचे ते मानतात. मा. दत्ताराम यांनी रंगभूमीला जीवन वाहून घेतले होते. एक कलाकार म्हणून रंगभूमीवर कसे राहिले पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ ते होते, असे सुखटणकर सांगतात. शशी मेहता यांच्यासह सुखटणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील स्वगते, कविता यांचा समावेश असलेला ‘शब्दकळा कुसमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम सादर केला. कुसुमाग्रज यांच्या सूचनेवरूनच ‘गोवा हिंदू’ने गोव्यात १९८१ ‘स्नेहमंदिर’ वृद्धाश्रम उभारला. रामकृष्ण नायक यांच्याबरोबर सुखटणकर यांचेही या कामात योगदान आहे. साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे आदी  मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली. मान्यवरांचा हा सहवास आणि लाभलेली मैत्री हीच खरी श्रीमंती असल्याचे त्यांना वाटते. २१ नोव्हेंबर रोजी ते ८६ वर्षे पूर्ण करुन ८७ व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. वयोपरत्वे आता त्यांचे फारसे घराबाहेर पडणे होत नाही. वृत्तपत्र आणि ललित साहित्याचे वाचन हा त्यांचा विरंगुळा आहे. चांगली नाटके ते आजही आवर्जून पाहतात. पत्नी शालिनी हिने आजवर मला सांभाळून घेतले.  मी ‘धि गोवा हिंदूू’ तर तिने घरचा ‘संसार’ सांभाळला असे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात. मुलगा संदीप व सून दीपाली, विवाहित कन्या विद्या व जावई प्रदीप शेणॉय आणि एक नातू व एक नात असा त्यांचा परिवार आहे.

गप्पांचा समारोप करताना ते म्हणाले, आयुष्यात समाधानी आणि आनंदी आहे. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. जर पुनर्जन्म असेल तर पुन्हा नाटय़कलेचा विद्यार्थी म्हणूनच जन्म मिळावा. रंगभूमीवर आजपर्यंत मी अनेक नाटकांमधून विविध भूमिका केल्या असल्या तरी ‘चिरकाल’ स्मरणात राहील अशी भूमिका करायची संधी मला मिळाली नाही. ती कसर पुढच्या जन्मात भरून निघावी..