मराठी अभिनेत्रींनी हिंदी मीलिकांमध्येही स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मराठमोळी नेहा पेंडसे. ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेमध्ये नेहा सध्या एका सुंदर, रुपवान बॉसच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेमुळे हिंदी भाषिक रसिकांमध्येही तिने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. पण, आता याच भूमिकेने नेहा अडचणीतचही आली आहे. नेहाच्या वाढत्या वजनामुळे मालिका निर्मात्यांनी तिला वजन कमी करण्याची सक्त ताकीद दिल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं प्रसिद्ध केलं आहे.

नेहाच्या या मालिकेचं कथानक आणि इतर पात्रांचा धमाल अभिनय पाहता प्रेक्षकांनीही फार कमी कालावधीतच ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेला आपलंसं केलं आहे. पण, आता मालिकेच्या या वळणावर नेहाचं वजन वाढल्यामुळे तिला पुन्हा एकदा पूर्ववत होण्याची ताकीद देण्यात आली आहे. असं झालं नाही तर नेहाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागू शकते, असं आणखी एक वृत्त ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहाला निर्मात्यांनी वजन कमी करण्यासाठी अल्टीमेटम दिला असून, तिने यावर गांभीर्याने विचार केला नाही. तर तिच्यासोबत काम करणं कठीण होऊन बसेल, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर नुकतंच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी नेहाची मुलाखत घेण्यासाठी आले होते. पण, नेहाने त्यांना मुलाखत देण्यास नकार दिला. वाढलेल्या वजनामुळे कोणी आपले फोटो काढू नयेत यासाठीच तिने असं केलं असावं, अशी माहितीसुद्धा सुत्रांनी दिली आहे.

वाचा: ‘द कपिल शर्मा शो’साठी सलमान बनला तारणहार

नेहाने या सर्व अफवा असल्याचं सांगत आपल्याला अशी कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. ‘निर्माते असं काहीच म्हणाले नाहीयेत. मी जशी आहे तशीच प्रेक्षकांना आवडते. माझ्या जाड किंवा बारीक असण्याने त्यावर काहीच फरक पडत नाही’, असं नेहा म्हणाली. नेहाचं हे वक्तव्य आणि टेलिव्हिजन विश्वात होणाऱ्या या चर्चांना आता कोणतं वळण मिळणार हे येत्या काळात कळेलच.