टेलिव्हिजन विश्वात काही नावाजलेल्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रींमध्ये अग्रस्थानी येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी. ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून ‘इशिता भल्ला’ म्हणजेच ‘इशिमा’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दिव्यांकाने अनेकांचीच मनं जिंकली आहेत. मुख्य म्हणजे तिच्या सालस भूमिकेचा अनेकांनाच हेवा वाटतो. पण, सध्या मात्र दिव्यांकाला एका वेगळ्याच गोष्टीची चिंता भेडसावतेय.

चंदिगढमध्ये शाळेतून घरी परतताना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या बातमीमुळे दिव्यांका अस्वस्थ झाली आहे. मुख्य म्हणजे या सततच्या घटनांमुळे मुलीचं पालकत्वच नकोय असंच तिचं म्हणणं आहे. महिलांच्या सुरक्षिततेविषयी होणारी हेळसांड आणि दिवसाआड वाढणारं बलात्काराचं प्रमाण या गोष्टींमुळे दिव्यांकाही अस्वस्थ झाली आहे.

टेलिव्हिजन विश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची खंत व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ट्विट करत दिव्यांकाने लिहिलं, ‘प्रिय पंतप्रधान मोदीजी, स्वच्छ भारत अभिनयानाअंतर्गत तुम्ही बलात्काऱ्यांचा कचरा नाहीसा करा. त्यांच्या भितीने जगणंही कठिण झालं आहे.’ त्यासोबतच आणखी एका ट्विटमधून मुलीला जन्म देण्याची भिती का वाटते यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. ‘मुलगी वाचवा, मुलगी वाचवा काय सुरु आहे? आता तर मला मुलगी व्हावी असंही वाटत नाही. मला भिती वाटतेय तिचं मातृत्त्व स्वीकारण्याची. काय उत्तर देईन मी तिला, की स्वर्गातून मी का तिला या नर्कात आणलं?’, असं ट्विट करत दिव्यांकाने तिचा संताप व्यक्त केला.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटना यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही तिने केली आहे. ‘महिलांची अवहेलना करणाऱ्या या नराधमांना अशी शिक्षा द्या की, त्यांचा थरकापच उडाला पाहिजे’, असं म्हणत तिने मोदी सरकारवर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही म्हटलं आहे. दिव्यांकाने एकामागोमाग एक ट्विट करत संपूर्ण महिला वर्गाचं एक प्रकारे प्रतिनिधित्वं केलं असंच म्हणावं लागेल. ‘महिलांनी कोणत्याही पक्षाला मत देणं बंद केलं पाहिजे. कारण आपली या देशात काहीच किंमत नाहीये’, असं म्हणत दिव्यांकाने तीव्र शब्दांत आपल्या भावना मांडल्या. तेव्हा आता सर्वसामान्यांसोबतच कलाकारांनाही परिस्थितीची जाणीव झाली असून, गुन्हेगारांच्या शिक्षांमध्ये काही आमूलाग्र बदल करण्यात यावेत अशीच मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. दिव्यांकाच्या या ट्विटला अनेक लाइक्स मिळाले असून बऱ्याच युजर्सनी ते रिट्विटही केले आहेत. तेव्हा आता यावर पंतप्रधान काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.