बॉलीवूडच्या प्रिन्सने त्याची एखादी इच्छा व्यक्त केली आणि ती किंग खानने पूर्ण केली नाही असं होईल का? यावेळी बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याचा सर्वात लहान मुलगा अब्राम खान याने राइडवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, डॅडी शाहरुखही आपल्या मुलाला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर ‘फन राइड’साठी बाहेर पडला. या पिता-पुत्राने वांद्रे येथील कार्टर रोडवर ओपन-टॉप कारने फेरफटका मारला.

गेल्या महिन्यात शाहरुखचा बहुप्रतिक्षित ‘रईस’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता त्याने आपल्या कामाला थोडा आराम दिला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकाला शाहरुख कनव्हर्टिबल कारमधून फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी आपल्या वडिलांच्या प्रसिद्धीने अनभिज्ञ असलेला अब्राम मुंबईच्या हवेचा आनंद घेताना दिसला. त्याच्यासाठी हा अनुभव नवीन होता. मात्र, त्याचवेळी शाहरुखचे चाहते भर दिवसा त्याला गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवताना पाहून चकित झाले होते.

https://www.instagram.com/p/BQvkGGuhfLG/

यावर्षी, चार वर्षांचा होणारा अब्राम हा शाहरुखचा लाडका आहे. बहुतेक कलाकार मंडळी आपल्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण, शाहरुख आपल्या लाडक्या लेकासोबत सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अजिबात कचरत नाही. इतकेच नाही, तर ‘मन्नत’ बंगल्यावर झालेल्या ‘रईस’च्या प्रमोशनवेळी अब्रामकडेच सर्वांच्या नजरा होत्या. शाहरुख टीव्हीएफला मुलाखत देत असताना मध्येच अब्राम तेथे आला आणि त्यावेळी या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर सर्वांचेच लक्ष वेधत होता.

https://www.instagram.com/p/BQvbe5rlv2C/

https://www.instagram.com/p/BQvWY7yjrNp/

त्या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अब्राम यांच्यातील संवाद अप्रितम असाच होता. व्हिडिओमध्ये अब्राम आपल्या वडिलांना अंगठ्याला दुखापत झाल्याचे सांगताना दिसत होता. त्यानंतर अब्रामच्या दुखापतीवर इलाज करण्यासाठी शाहरुखने तेव्हा डॉक्टरची भूमिका केली. गंमत म्हणून शाहरुखने अब्रामला इंजेक्शन देण्याचा अभिनयदेखील केला. त्याच्या या डॉक्टरच्या अभिनयावर अब्रामने थक्क करणारी प्रतिक्रिया दिल्याचे व्हिडिओत पाहावयास मिळाले होते. शाहरुखने इंजेक्शन दिल्याचे नाटक केल्यानंतर अब्रामनेही आपल्यातील अभिनयाचा गुण दाखवून दिला. इंजेक्शन दुखल्याचे त्याचे हावभाव अभिनयाला साजेसे असेच होते.