अभिनेता शाहरुख खान २५ जानेवारीला ‘रईस’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने व्यग्र असणाऱ्या शाहरुख खानने नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ‘रईस’ या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या कारकीर्दीबद्दल शाहरुखने मनमोकळ्या गप्पा मारल्या. रईसच्या डोळ्यात सुरमा भरलेल्या निराळ्या लूकपासून ते अगदी या चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक दृश्याच्या चित्रिकरणाचा किस्साही शाहरुखने या संवादादरम्यान उलगडला. चला तर मग जाणून घेऊया ‘रईस’विषयी खुद्द किंग खान सांगतोय तरी काय…

‘रईस’ चित्रपट स्वीकारण्यामागचे कारण?
माझ्या मते इथे मुख्य बाब ही आहे की, हा चित्रपट फार सुंदर लिहिण्यात आला आहे. माझ्या माहितीनुसार एका पत्रकाराने हा चित्रपट लिहिला आहे. त्यामुळे सर्व माहिती आणि चित्रपटातील संवाद हे रोजच्या जीवनातून प्रेरित होऊनच घेण्यात आले आहेत. त्यामुळेच हे संवाद आता प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहेत. जसे ‘बनिये का दिमाग मिया भाई की डेरिंग’ हा संवाद. प्रत्येक मुख्य पात्रामध्ये त्याच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी, कोणा एका मित्राला वाचविण्यासाठीचे मोठेपण, धाडस दडलेले असले पाहिजे. पण, या चित्रपटाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर ‘रईस’ हा एका वाईट जगतातून आलेला आहे. पण, त्यातही या पात्राचा स्वत:चा असा रुबाब आहे. कोणत्याही पातळीच्या पुढे जाऊन हा काहीतरी करुन बसतो त्यावेळी त्या कृत्याची पूर्ण जबाबदारी घेण्यापासून तो मागे येत नाही. माझ्यामते केलेल्या कृत्यांची जबाबदारी घेणं ही कोणासाठीही ही एक धैर्याचीच गोष्ट आहे.

चित्रपटातील अभिनेत्री, तिचं पात्र काहीसं प्रतिगामी वाटत आहे. याबद्दल तुला काय वाटतं?
(मिश्किलपणे हसून) आपल्याकडील अभिनेत्रीही प्रतिगामी आहेत. त्या माझ्याशी नेहमी तसेच वागतात. मी त्यांच्यासोबत कितीही गप्पा मारल्या तरीही त्या मात्र माझ्यासोबत प्रतिगामीपणेच वागतात. माझ्यामते ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘ओम शांति ओम’ या चित्रपटांतील माझ्या भूमिकेतील काही गोष्टी अधोरेखित करण्याची गरज नव्हती. पण, इथे गोष्ट वेगळी आहे. दिग्दर्शक राहुल ढोलकिया वास्तवदर्शी गोष्टींना प्राधान्य देतो आणि हा चित्रपटही अशाच काही घटनांवर आधारित आहे. त्यामुळे एक नवीन अभिनेत्री घेण्यामागे काही उद्देश होते. अभिनेत्रीच्या (माहिराच्या) भूमिकेसाठी ऑडिशन्सही घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे वास्तवदर्शी चेहरे दाखविण्यासाठी तिची निवड करण्यात आली. आझिया (माहिरा) या चित्रपटामध्ये मी साकारत असलेल्या पात्रासाठी एक अदृश्य प्रेरणास्त्रोत आहे
या क्षणाला कोणत्या गोष्टीची खंत वाटते का?
एक कलाकार म्हणून तुम्ही नेहमीच असंतुष्टच असले पाहिजे. माझे कोणते असे ध्येयच नव्हते. कारण ध्येयपूर्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंत आहे. त्या तुलनेत मैलाचा दगड प्रस्थापित करणं ही एक चांगली बाब आहे. मी दिवसातून पंधरा-वीस तास काम करतो. त्यात मला उत्साह वाटतो कारण मी सतत काहीतरी नवीन करत असतो. त्यामुळे मी चित्रपटांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं यशापयश पाहातच नाही. मी खूप भाग्यवान आहे की माझ्यामध्ये जितकी कलात्मकता आहे ती आणखीन खुलविण्याची संधी मला मिळत आहे.

याआधीही केलेल्या अॅक्शन चित्रपटांपैकी ‘रईस’मध्ये काय वेगळे पाहण्याची संधी मिळणार आहे?
चित्रपटाचे कथानक पूर्णपणे एखाद्या अॅक्शन चित्रपटाप्रमाणे नाहीये. एक हिरो आहे, ज्याच्यावर बालपणी झालेल्या अत्याचाराची परतफेड करण्यासाठी तो मग पुढे लढतो असे या चित्रपटाचे कथानक नाहीये. एक माणूस शक्य त्या सर्व मार्गांनी यश मिळविण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो असेच काहीसे कथानक या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. या चित्रपटामध्ये काही अनपेक्षित दृश्येही आहेत. यात वास्तवदर्शी थरारदृश्ये तुम्हाला पाहण्यास मिळतील. राहुल ढोलकिया याचा वास्तवदर्शी चित्रपटांवर भर असल्यामुळे थरारक दृश्यांमध्येही त्याची ही जमेची बाजू झळकते. चित्रपटामध्ये जवळपास पाच थरारदृश्ये आहेत, ज्याच्या पार्श्वसंगीताचे कामही उत्तमपणे पार पाडण्यात आले आहे.

‘रईस’ साकारण्यामध्ये तुझे योगदान किती आणि नवाझुद्दिन सिद्दीकीसोबत अभिनय करण्याचा अनुभव कसा होता?
अनेकदा जेव्हा दिग्दर्शक त्यांना हवे तसं पात्र साकारण्यासाठी त्याबद्दलची विस्तृत माहिती देतात. राहुल या चित्रपटामध्ये माझ्या पात्राविषयी सर्व काही जाणून होता. चित्रपटामध्ये माझे पात्र वयाच्या तीन वेगवेगळया टप्प्यांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे माझ्या पेहरावातूनही ते वेगळेपण झळकते आहे. मी साकारलेल्या भूमिकेसाठी आम्ही सर्वांनी आपापले योगदान दिले आहे. माझ्या लूकविषयी म्हणाल तर माझी वेशभूषा कशी असावी हे वेशभूषाकार शीतल आणि राहुलला ते फार आधीपासूनच ठाऊक होते. कधी त्यांनी माझ्या डोळ्यांसाठी काजळ वापरले. कधी ते जास्त जाड लावले, कधी ते कमी केले. पण, एकंदर कोणत्याही पात्राचं पहिलं चित्र हे चित्रपटाच्या दिग्दर्शकाला स्पष्ट झालेलं असतं.
नवाझचं म्हणाल तर तो खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्यासारखे अभिनेते हे वास्तवदर्शी चित्रपट विश्वातून आले आहे आहे. किंबहुना आम्ही थिएटर अॅक्टर असल्यामुळे आमच्यात अनुभवांची देवाणघेवाण झाली. मी आणि नवाझभाई आम्ही बऱ्याच काळानंतर एकत्र काम करत आहोत. चित्रपटातील आमच्या परस्पविरोधी भूमिकांना नजरेत घेत चर्चा करत आम्ही अभिनय केला आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांच्या अभिनय कौशल्याचा आदर आहे आणि त्यामुळेच शंभर टक्के मी या सर्व प्रक्रियेतून खूप काही शिकलो आहे.

चित्रपटातील कोणत्या भागाचे चित्रिकरण करण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला?
चित्रिकरणादरम्यान मी दुखापतग्रस्त झालो होतो त्यानंतरच दोन दृश्यांचे चित्रिकरण करायचे होते ते थोडे कठीण वाटले. एक ‘रुफ टॉप चेस सिक्वेन्स’ होता त्यावेळी माझ्या पायाला गंभीर दुखापत होती आणि त्यानंतरच या दृश्याचे चित्रिकरण करण्यात आले. त्यावेळी माझ्याही मनात एक प्रकारची भिती होती.

‘एक कलाकार होण्याचा मार्ग माझा मी निवडला होता. कलाकार झाल्यानंतर तुमचं आयुष्य काही प्रमाणात इतरांच्या हाती जातं हे विसरुन चालणार नाही. तुम्हाला स्वत:वर संयम ठेवता आला पाहिजे. माझ्या घराजवळ येऊन चाहत्यांनी मला शुभेच्छा देणं ही बाब मला फार आवडते. पण, त्याचवेळी काहीजण माझ्यासाठी काही वाईट शब्दही वापरणार हे तर स्वाभाविक आहे. एका गोष्टीचा स्विकार करुन तुम्ही दुसरी गोष्ट नाकारु शकत नाही’, असे म्हणत शाहरुखने सर्वांचे लक्ष वेधले. ‘काबिल’ आणि ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांच्या एकाच दिवशी प्रदर्शित होण्याविषयी विचारले असता शाहरुखनेही त्याचे मत मांडले आहे. ‘दोन एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित झाले तर नक्कीच चित्रपटांच्या कमाईवर त्याचा परिणाम होणार. पण, तरीही मी त्यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देतो’, असे म्हणतच त्याने हेही स्पष्ट केले की जर असे झाले नसते तर जास्त चांगले झाले असते.