आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. अशीच इच्छा काही दिवासांपूर्वीच कर्करोगग्रस्त अरुणा पी.के यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसते. कारण, स्वतः शाहरुखने त्यांच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश पाठवला आहे. यात त्याने अरुणा यांची भेट घेण्याचेही आश्वासन दिलंय.

वाचा : अन् मलायका आणि अर्जुनने एकमेकांना टाळले

अनेकदा सोशल मीडियावर मीम्सद्वारे एखाद्याची खिल्ली उडवली जाते तर कधी एखाद्याला ट्रोल केले जाते. पण, काही दिवसांपूर्वी अरुणा पी.के यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी #SRKMeetsAruna हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. त्यामुळेच शाहरुखला अरुणा यांच्याबद्दल समजले. त्यानंतर या ‘रईस’फेम अभिनेत्याने त्याच्या फॅनपेजवरून अरुणा यांच्यासाठी संदेश शेअर केला.

वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम राधिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्याकडे मागितले ‘हे’ गिफ्ट!

‘तुम्ही कर्करोगाशी झुंज देत असल्याचे मला तुमचा मुलगा अक्षत आणि मुलगी प्रियांका यांच्याकडून समजले. मी, माझे कुटुंब, माझा संपूर्ण मित्रपरिवार आणि ज्यांना तुमच्याबद्दल माहिती आहे ते सर्वजण तुमची प्रकृती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतोय. आपण लवकरच भेटू’, असे शाहरुखने या व्हिडिओत म्हटलेय. तसेच, डॉक्टरांची परवानगी मिळताच त्याने फोनवरून अरुणा यांच्याशी संवाद साधण्याची इच्छाही व्यक्त केली.

अरुणा यांच्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांना २०११ साली गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे कळले होते.