शाहरुख खान याच्या ‘रईस’ या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान असल्यामुळे त्यावरुन एकच वाद पेटला होता. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडणार का? आणि या चित्रपटाच्या कमाईवर त्यांचा परिणाम होणार का? याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, ‘रईस’ या चित्रपटातील माहिरा खानच्या एकाही दृश्यावर कात्री चालवण्यात आलेली नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

पाहा: VIDEO: एका ट्रेलरमुळे सोशल मीडियासुद्धा झाली ‘रईस’

‘रईस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पण गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहता माहिरासुद्धा यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे यावरुन आता पडदा उठला आहे. माहिरा खानच्या या चित्रपटातील सहभागामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा होती की ‘रईस’मधील माहिराच्या भूमिकेसाठी तिच्याऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. पण, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रितेश सिधवानीने हे स्पष्ट केले होते की, ‘या चित्रपटातील माहिरावर चित्रीत एकाही दृश्यावर कात्री चालविण्यात आलेली नाही’.

माहिराच्याच भूमिकेविषयी बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘माझ्या आतापर्यंतच्या २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीमध्ये मी कधीही एडिटिंग रुममध्ये जात कोणा एका कलाकाराच्या भूमिकेविषयी एडिटिंगच्या कामामध्ये लुडबूड केली नाही. कारण हा त्या कलाकाराचा अनादर ठरेल’. शाहरुखने त्याच्या बोलण्यातून हेसुद्धा स्पष्ट केले की माहिरा या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण, या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान माहिरा सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला असता या चित्रपटाच्या निर्मात्यांतर्फे सांगण्यात आले की, ‘जर गरज असेल तर माहिरा नक्कीच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होईल. सरकारतर्फे अजून असा कोणताही नियम बनवण्यात आला नाहीये, की त्या कलाकारांना आपल्या देशाचा व्हिसा मिळू नये. त्यामुळे जर गरज वाटली तर ती नक्कीच प्रमोशनदरम्यान दिसू शकेल’.

राहुल ढोलकीया दिग्दर्शित ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतिफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतिफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतिफच्या मुलाचीही भेट घेतली होती. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या भूमिका असणारा ‘रईस’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.