भारतातील आणि जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाण्याऱ्यांपैकी एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे नेहमीच त्यांच्या व्यवसायासोबतच विविध वर्तुळांमध्येही सक्रिय दिसतात. त्यातही बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाशी त्यांच्या कुटुंबाचे नाते तसे घनिष्टच. सध्या अंबानी चर्चेत आहेत ते म्हणजे त्याच्या मुलीच्या लग्नामुळे. मुकेश अंबानींची मुलगी ईशा, हिच्या लग्नामध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार असा अंदाज अनेकजण वर्तवत असतानाच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशाच्या लग्नसमारंभाची रंगत आणखीन वाढवण्यासाठी खुद्द किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याचा नृत्याविष्कार सादर करणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंबानींच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचा लग्नसोहळा कसा असणार याकडेच अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. हा सोहळा नक्कीच दिमाखदार आणि भव्य असणार यात काही शंकाच नाही. सोबतच अंबानींच्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, कला आणि क्रिडा वर्तुळातून काही मान्यवरही हजेरी लावणार आहेत. या विवाहसोहळ्याचीच चर्चा सध्या रंगत आहे. त्यातही शाहरुख खान या विवाहसोहळ्यामध्ये त्याच्या धम्माल डान्स परफॉर्मन्स सादर करणार असल्यामुळे उपस्थितांचे ‘किंग खान स्टाईल’मध्ये मनोरंजन होणार आहे. किंग खान ईशाच्या विवाहसोहळ्यामध्ये थरकणार असल्याची चर्चा असली तरीही अजून त्याबद्दलची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, किंग खान सध्या इम्तियाज अलीच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमधील नयनरम्य ठिकाणी करण्यात आले आहे. सध्या किंग खान त्याच्या आगामी ‘रईस’ आणि ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता किंग खानच्या ‘रईस’ या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच ‘डिअर जिंदगी’मध्येही पाकिस्तानी अभिनेता अली जफरचा सहभाग आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातच या चित्रपटांचे भवितव्य ठरणार आहे असेच म्हणावे लागेल.