बॉलीवूड बादशहा शाहरुख खान याचा गेल्या वर्षीपासून लटकलेला ‘रईस’ चित्रपट अखेर उद्या प्रदर्शित होत आहे. मूळ तारखेपेक्षा सहा महिने उशिराने हा चित्रपट प्रदर्शित होतोय. शाहरुखच्या रईससोबतच हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

लाइव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षापासून अडकलेला शाहरुखचा ‘रईस’ चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३५ कोटी रुपयांचा गल्ला कमविण्यात यशस्वी होणार का? असा प्रश्न पडला असतानाच ट्रेड पंडित आणि वितरक अक्षय राठी यांच्या मते, आधीपासूनच हा चित्रपट नुकसान सहन करत आहे. ‘रईस’ चित्रपट हा गेल्या वर्षी ईदच्या दिवशी सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटासोबत प्रदर्शित होणार होता. पण, सलमानच्या चित्रपटासोबत आपला चित्रपट प्रदर्शित केला तर तो नक्कीच तोट्यात जाऊ शकतो या विचाराने शाहरुखने त्याचा चित्रपट प्रदर्शित केला नव्हता. फरहान अख्तर, रितेश सिधवानी, गौरी खान यांनी ‘रईस’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट जवळपास ७५ कोटी रुपये इतक्या बजेटमध्ये बनला असून यात शाहरुखच्या मानधनाचा आकडा समाविष्ट नाही. शाहरुख त्याच्या चित्रपटासाठी ३० ते ४० कोटी इतके मानधन घेतो. गेल्या काही काळापासून शाहरुख त्याच्या चित्रपटांची निर्मिती स्वतःच करत असल्याने तो  मानधन घेण्यापेक्षा नफ्यातील ५० टक्के वाटा घेतो.

प्रदर्शनासाठी सहा महिन्यांपासून लटकलेल्या ‘रईस’ चित्रपटाला जवळपास ५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील पंचवीस एक करोड रुपये दोन्ही कंपन्यांचे पगार आणि पब्लिसिटीतच गेले आहेत. त्यातून हा चित्रपट ‘काबिल’सोबत प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अक्षयच्या मते ३००० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होऊनही पहिल्या आठवड्यात चित्रपटाला ७५ कोटींचे नुकसान होऊ शकते. प्रदर्शनानंतर चित्रपटाने पहिल्या चार दिवसात १०० कोटींची कमाई करणे गरजेचे आहे. शाहरुखच्या ‘दिलवाले’ आणि ‘फॅन’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी काही चांगली कमाई केली नव्हती. ‘दिलवाले’सोबत तेव्हा रणवीर, दीपिका आणि प्रियांकाचा ‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित झाला होता. तेव्हा रणवीरचा ‘बाजीराव मस्तानी’ शाहरुखच्या ‘दिलावाले’वर भारी पडला होता.