अभिनेता शाहरूख खानचा ‘रईस’ आणि सलमान खानचा ‘सुलतान’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची अटकळ होती. मात्र, ‘रईस’च्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही ‘बिग बजेट’ चित्रपट ईदच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटासाठी आता चाहत्यांना पुढील वर्षाच्या जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे. ‘रईस’ चित्रपट जानेवारीच्या २६ तारखेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची निर्णय सोपा नव्हता. ‘रईस’ चित्रपटाची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत याची आम्हाला कल्पना आहे. तो जास्तीत जास्त प्रेक्षकांना पाहता यावा, यासाठी आम्हाला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या निवेदानात म्हटले आहे.

दरम्यान, शाहरुखनेही याआधी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सलमान आणि त्याच्या चित्रपटाची टक्कर होणार नाही, याचा विचार केला जात असल्याचे सांगितले होते. सलमान खानचा बहुप्रतिक्षीत सुलतान चित्रपट यंदा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असून, चित्रपटात सलमान कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्माचीही महत्त्वाची भूमिका आहे.