बॉलिवूडमध्ये बिनधास्त स्वभावाने वावरणारी कंगना नेहमीच सहकलाकारांसोबतच्या वादामुळे चर्चेत असते. नुकतेच ‘रंगून’ चित्रपटावेळी ती आणि शाहिद यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, कंगना आणि शाहिद दोघांनीही वादावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. कंगनाने सेटवर मैत्री करण्यासाठी नव्हे, तर काम करण्यासाठी येत असल्याचे सांगत शाहिदसोबतच्या वादावर पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला होता. तर, शाहिदनेही दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे सांगत चित्रपटाच्या प्रसिद्धीवर काही परिणाम होणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी दोघे एकत्र दिसले तरी त्यांच्यात गोडवा आहे, अशी एकही गोष्ट दिसली नव्हती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर पुन्हा एकदा शाहिदला कंगनासोबतच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी शाहिद म्हणाला की, कंगनाचा स्वभाव अगदीच वेगळा आहे. ती चित्रपटापेक्षा सहकलाकारावर जास्त लक्ष केंद्रीत करते. तिने यातून बाहेर पडून सहकलाकाराशी संगनमताने वागण्याची गरज आहे. हेच तिच्या हिताचे असेल, असे सांगत शाहिदने कंगनाच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज याच्या बहुचर्चित ‘रंगून’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर शाहिद कपूर, कंगना रणौत आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाने रंगविण्यात आलेल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.  कंगनाला या चित्रपटाच्या अपयशाचा धक्का बसला नसला, तरी शाहिद कपूरने यापूर्वी चित्रपटाच्या अपयशाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने अप्रत्यक्षरित्या ही खंत व्यक्त केली होती.

शाहिदच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, तो संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  राजा रावल रतन सिंग, अलाउद्दिन खिल्जी आणि राणी पद्मावती या ऐतिहासिक पात्रांभोवती ‘पद्मावती’ या चित्रपटाचे कथानक फिरणार आहे.  या चित्रपटासाठी त्याने अधिक मेहनत घेतली असून ‘रंगून’च्या अपयशानंतर त्याला या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा असतील. तर दुसरीकडे कंगना हंसल मेहता यांच्या ‘सिमरन’ चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या अभिनयातील जादू दाखविण्यास प्रयत्नशील असेल.