बॉलीवूडमध्ये जोडय़ा जमणे आणि तुटणे यांच्यामध्ये एक मोठा अवकाश असतो आणि त्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्या चवीने चर्चिल्याही जातात. मात्र एकदा जोडी तुटल्यानंतर पुन्हा दुसऱ्याबरोबर आयुष्याची सुरुवात करताना तोच गोडवा कायम ठेवणे कित्येकांना कठीण होऊन जाते. बॉलीवूडच्या आत्ताच्या फळीने दूर गेल्यानंतरही हा गोडवा टिकवण्याची किमया साधली आहे. आणि त्याचे ताजे उदाहरण करीना आणि शाहीदच्या रूपाने पुढे आले आहे. एकेकाळी प्रेमभंग झाल्यानंतर एकमेकांशी संवादही न साधणारे हे दोन्ही कलाकार आपापल्या आयुष्यात नव्या जोडीदारांबरोबर खूप पुढे गेले आहेत. योगायोग असा की शाहीदची पत्नी मीरा गर्भवती असल्याचे जाहीर केल्यानंतर कोही दिवसांत करीनालाही मातृत्वाची चाहूल लागल्याची बातमी आली. त्यामुळे हे दोघेही माजी प्रेमी एकाच वर्षी पालकांच्या भूमिकेत शिरणार हे नक्की झाले. दोघांनीही याच वर्षी एका चित्रपटात कामही केले आणि त्यानिमित्ताने का होईना जुने जे काही उरले होते तेही गंगेत वाहते झाले आणि त्यांच्या नव्या मैत्रीपूर्ण नात्याचे दर्शन लोकांना सध्या घडते आहे. शाहीदला मुलगी झाल्याचे कळताच करीनाने लगोलग त्याला शुभेच्छा संदेश पाठवला. याआधीही शाहीदचे लग्न ठरले तेव्हा त्याने पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला कळवली होती, असे सांगून करीनाने आश्चर्याचा धक्का दिलाच होता. आता तर या दोघांचे जोडीदारही आपापसात चांगले रुळले आहेत. म्हणजे शाहीद आणि सैफ अली खान यांच्यातही घट्ट मैत्री जमली आहे. सध्या तर ते ‘रंगून’ या चित्रपटात एकत्र कामही करत आहेत. त्यामुळे जोडी तुटली की कडू चेहऱ्याने वर्षांनुवर्षे एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याच्या बॉलीवूडच्या सवयीला या तरुण कलाकारांनी बहुधा रामराम ठोकला असावा, असे दिसते.