बॉलिवूडचा किंग शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख अभिनेत्री अनुष्का शर्मासह जवळपास गेले दोन महिने विविध देश फिरत आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटासाठी किंग खान सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या व्यग्र शेड्यूलमधून किंग खानने काही दिवसांची सुट्टी घेतली असून त्याने ही सुट्टी खास त्याच्या वाढदिवसासाठी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किंग खान यंदा त्याचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासमवेत देशाबाहेर साजरा करणार आहे.

अभिनेता शाहरुख खान नेहमीच ‘मन्नत’ या त्याच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करतो. यासोबतच वाढदिवशी चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत किंग खान दरवर्षी प्रसारमाध्यमांशी संवादही साधतो. पण, यंदा मात्र तसे काही होणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यंदा किंग खानच्या वाढदिवशी प्रसारमाध्यमेही त्याच्या भेटीला मुकणार अशी चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून ‘द रिंग’लाच सर्वस्वी वेळ देणाऱ्या शाहरुखने त्याचा हा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करण्याचा बेत केला आहे असेच दिसतेय. ‘द रिंग’च्या निमित्ताने शाहरुखने आतापर्यंत प्राग (चेक रिपब्लिक), अॅम्स्टरडॅम, लिस्बन, बुडापेस्ट अशा विविध ठिकाणांना भेट दिली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये शाहरुखने साकारलेल्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुख खान अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या पतीची भूमिका साकारत आहे.