बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘रईस’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सध्या या सिनेमाचे संगीत, गीत, अॅक्शन, संवाद सगळ्याच गोष्टींची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एक फार सुंदर घटणा घडली. सध्या ‘रईस’ म्हटलं की शाहरुख आणि त्याचा सिनेमा याबद्दलच विचार डोक्यात येतात. पण यावेळी खुद्द शाहरुखलाच ‘रईस’ला भेटण्याची संधी मिळाली. शाहरुख यावेळी फक्त एका ‘रईस’ला नाही तर तब्बल ११ रईस नावाच्या व्यक्तींना भेटला.

शाहरुखने मेहबूब स्टुडिओमध्ये ११ रईस नावाच्या व्यक्तिंना भेट दिली. खऱ्या आयुष्यात ‘रईस’ असे नाव असलेल्या व्यक्तिंची शाहरुख यावेळी स्वतः चौकशी केली. ते काय करतात आणि त्यांचे आयुष्य कसे चालले आहे याबद्दलही त्यांनी चौकशी केली आहे. एवढ्या जवळून शाहरुखला भेटायला मिळाल्याने ते ११ ही रईस फार खूश होते. शाहरुख खानने या ११ ‘रईस’सोबत थोडा वेळ घालवला आणि मजा मस्तीच्या वातावरणात ते शाहरुखला भेटले याचे दडपण त्यांच्यावर येऊ दिले नाही. त्यामुळे खऱ्या आयुष्यातले हे रईस, पडद्यावरच्या ‘रईस’सोबत झालेली भेट कधीही विसरणार नाहीत.

यावेळी शाहरुख म्हणाला की, ‘रईस’ या शब्दाचा अर्थ फक्त पैसेवाला असे नाही तर ‘रईस’चा अर्थ दयाळू असाही होतो. २५ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘रईस’ सिनेमात शाहरुखसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राहुल ढोलकिया याने केले आहे. तर सिनेमाची निर्मिती रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एण्टरटेनमेन्ट आणि शाहरुख आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज् एण्टरटेनमेन्टने केली आहे.

‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे.