‘रईस’ सिनेमा प्रदर्शित व्हायला आता फक्त एक आठवडाच राहिला आहे. असे असले तरी या सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘रईस’चा अजून एक डायलॉग प्रोमो प्रदर्शित केला आहे. हा डायलॉग प्रोमो बघून आधीचे संवाद अधिक चांगले की हा असाच संभ्रम अनेकांना पडत आहे. आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आलेले ‘रईस’चे सगळेच संवाद दमदार आहे. ‘रईस’चा हा प्रोमो पाहिला तर यात शाहरुखचे संवाद असो किंवा नवाजुद्दीन सिद्दीकीचा संवाद असो दोघांचेही संवाद हे प्रभावी आहेत.

या प्रोमोमध्ये शाहरुख आणि नवाजुद्दीनमधली शाब्दिक चकमक दाखवण्यात आली आहे. मजुमदार ही व्यक्तिरेखा साकारणारा नवाज, शाहरुखला म्हणतो की, ‘तुझे सध्या दिवस चांगले सुरु आहेत.’ यावर उत्तर म्हणून रईस म्हणजे शाहरुख नवाजला म्हणतो, ‘दिवस आणि रात्र तर लोकांसाठी असते मजुमदार साहेब.. पण वाघांचा तर जमाना असतो.’

 

राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे.

शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे राहुल, राज… अशा रोमॅण्टिक भूमिका साकारणारा हा ‘रईस’ अभिनेता त्याच्या या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.