आपल्या प्रत्येक मोठय़ा चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी हमखास वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची कला अवगत असलेल्या शाहरूख खानने या वेळीही एक मोठा वाद ओढवून घेण्याची तयारी केली आहे. शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी यांना तिसरे अपत्य होणार असून हे अपत्य ‘सरोगेट मदर’ तिच्या पोटात वाढवत आहे, ही बातमी सर्वश्रुत आहे. या वेळी शाहरूखने गर्भलिंगनिदान चाचणी केल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी शाहरूखला क्लिन चिट दिली आहे.
भारतात गर्भलिंगनिदान चाचणी हा गुन्हा आहे. मात्र शाहरूखने आपल्या बाळाचे लिंगनिदान थेट ट्विटरवर जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली. याबाबत शाहरूख दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही पालिकेने सोमवारी जाहीर केले. मात्र मंगळवारी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करत शाहरूखला क्लिन चिट दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
‘चेन्नई एक्सप्रेस’ या आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी हा वाद सुरू झाल्याने हे शाहरूखने मुद्दामच केल्याची चर्चा आहे.