‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ‘श्री’ची भूमिका साकारत अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी जागा मिळवली आहे. त्याने रंगवललेले ‘श्री’चे पात्र प्रेक्षकांना इतके भावले की, प्रत्येक आईला तिचा मुलगा अगदी ‘श्री’ प्रमाणेच असावा असे वाटू लागले. प्रेक्षकांच्या मनात जागा बनवल्यानंतर सर्वांच्याच लाडक्या शशांक केतकरने प्रेक्षकांच्या पोटातही जागा बनवण्याचे ठरवले आहे. अभिनेता म्हणून नावारुपास आलेल्या शशांकने पुण्यात एक हॉटेल सुरु केले आहे. याबाबतच लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना शशांकने त्याच्या शब्दांतून सफर घडवली आहे ‘आईच्या गावात’ची.

लहानपणापासूनच मला जेवणाची आणि एकंदर जेवणाशी निगडीत विविध गोष्टींची आवड होती. घरात आईच्या जेवणात काही बदल झाला तरीही ते मी लगेचच ओळखायचो. माझी हीच आवड आणि एकंदर माझ्या आईवडिलांनी दिलेले संस्कार यांमुळे मी एक हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी ‘आईच्या गावात’ची सुरूवात केली. पुण्यात शास्त्री रोडवर मी हे हॉटेल सुरु केलं आहे. या हॉटेलच्या नावातही गंमत आहे. ‘आईच्या गावात’ हा शब्द हल्ली प्रत्येकाच्याच तोंडातून ऐकायला मिळतो. कॉलेजमध्ये जाणाऱ्यांपासून ते अगदी मालिकांतील पात्रांच्या बोलण्यातूनही हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. त्यामुळे एका लक्षवेधी अशा नावाच्या शोधात असतानाच ‘आईच्या गावात’ हेच नाव माझ्या हॉटेलसाठी ठरवण्यात आलं. हॉटेल काढण्याचा विचार माझ्या डोक्यात फार आधीपासूनच होता, पण काही कारणास्तव हे सर्व त्यावेळी शक्य झालं नाही. पण, सध्याच्या घडीला मात्र माझं हे स्वप्न साकार झालं आहे.

‘आईच्या गावात’ हे एक अस्सल मराठी पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळणारं हॉटेल आहे. दडपे पोहे, मेथीचे आणि विविध प्रकारचे (महाराष्ट्रीयन चवीचे) पराठे, थालीपीठ असे सर्व पदार्थ इथे तुम्हाला खायला मिळतील. कॉलेजिअन्सना लागलेली जंक फूडची सवय घालवण्यासाठी ‘आईच्या गावात’ वडापाव मिळत नाही ही लक्षात घेण्याची बाब. वडापाव मिळत नसला तरीही मोबाईलच्या चार्जिंगच्या सुविधेपासून ते अगदी वायफायपर्यंत सर्वच महत्त्वाच्या सेवाही या हॉटेलमध्ये पुरविण्यात येत आहेत. ‘आईच्या गावात’मधील माझा आवडता पदार्थ म्हणाल तर इथली मिसळ मला फार आवडते आणि जर मी अतिशय घाईत असेन तर मग दडप्या पोह्यांचा पर्याय आहेच. अशा या आमच्या ‘आईच्या गावात’ आईच्या हातच्या चवीची अनुभूती देणारे पदार्थ आम्ही सर्व्ह करतो. मला जेव्हा जेव्हा सुट्टी असेल किंवा माझ्या कामातून वेळ मिळेल तेव्हा मी ‘आईच्या गावात’ जाण्याला प्राधान्य देतो. कारण मी याला माझी जबाबदारी समजतो. मी ‘आईच्या गावात’ असताना एक अभिनेता म्हणून कधीच वावरत नाही. पण, मी तिथे असल्यावर होणारी गर्दी, काढले जाणारे सेल्फी या साऱ्या गोष्टी मला फार आनंद देऊन जातात.

माझ्या हॉटेलमधील माझी आणखी एक आवडीची गोष्ट म्हणजे ‘अभिप्रायाची वही’. जे जे ‘आईच्या गावात’ येतात त्यांना त्यांचे अभिप्राय लिहिण्यासाठी आम्ही एक वही ठेवली आहे. लोकांनी लिहिलेले अभिप्राय वाचायला मला फार आवडतं. ‘आईच्या गावात’ हे माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे. दिवाळीच्या निमित्ताने ‘आईच्या गावात’ खास असे काही प्लॅन्स नसले तरीही मी आईच्या हातच्या फराळावर ताव मारणार आहे. आता हे कितपत शक्य होतं ते मात्र मला ठाऊक नाही. पण तरीही….

(शब्दांकन- सायली पाटील)

14520378_534840003379506_5404804435806590484_n