एफटीआयआयमधील उत्साही वातावरण पाहून खूप बरे वाटत आहे, अशा शब्दांत अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संस्थेतील बदललेल्या वातावरणावर भाष्य केले. ‘खामोश’ म्हणत अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी अचानक फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेला भेट दिली. संस्थेच्या नियामक मंडळातील नियुक्त्यांवरून विद्यार्थ्यांनी मध्यंतरी अभ्यासबंद आंदोलन केले होते, त्याबाबत बोलताना सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे दिले. सन २०१३ आणि २०१६ सालच्या तुकडीतील अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. संस्थेमधील १९६५-६७ दरम्यानचे विद्यार्थिदशेतील अनुभव, गुरूकडून मिळालेले मार्गदर्शन, अभिनेता म्हणून घडण्याची प्रक्रिया असा पट त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. एक अभिनेता म्हणून चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, याचीही जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. येथे पदविका करत असताना त्यांनी केलेल्या फिल्म्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या.

या वेळी अभिनय विभागप्रमुख टॉम अल्टर आणि कुमार शहानी उपस्थित होते.