“शौर्य – गाथा अभिमानाची” या मालिकेची पुढची गोष्ट आहे, पोलीस अधिकारी राकेश मारिया आणि सुरेश वालिशेट्टी यांची. त्यांनी १९९३ बॉम्बस्फोटाच्या नंतर गुन्हेगारांना पकडताना दाखवलेले शौर्य तुम्हाला पाहता येणार आहे. एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना, सर्वप्रथम गुन्हेगार कोण? हे शोधणं ज्याप्रमाणे महत्त्वाचं; त्याचबरोबर त्याला अटक होऊन त्याला शिक्षा होणेही तितकेच महत्त्वाचे असते. एखादा गुन्हा घडल्यांनंतर तो गुन्हा दाखल करणे, पंचनामे, साक्षीदार आदी अनेक बारीकसारीक तपशील न्यायालयापुढे नीट मांडणे आणि तद्नुषंगिक कागदपत्रे सादर करणे हे खूप महत्वाचे असते. निवृत्त सहाय्यक आयुक्त सुरेश वालिशेट्टी यांनी या प्रत्येक खटल्यात तपास अधिकारी म्हणून केलेली मेहनत ही वाखाणण्याजोगी आहे. या भीषण बॉम्बस्फोट मालिकांच्या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त असताना, राकेश मारिया यांनी केलेल्या तपासामुळे आरोपींना देहदंडाची शिक्षा झाली. हे सर्वच ढोबळ मानाने आपल्या सर्वांना माहित आहे. बॉम्बस्फोटासारख्या घटनेने सामान्य नागरिक आणि महाराष्ट्र पोलीस एकाच विचाराने सावरत होते की, ज्यांनीही हे केलंय त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आणि शोधमोहिमेला लागले. आणि मुख्य आरोपी टायगर मेमन पर्यंत जाऊन पोहोचले. पण बॉम्बस्फोटाच्या तपासाची ओपनिंग मुंबई पोलिसांना कुठून मिळाली? या केसच्या तपासाचा पहिला जनक कोण होता अश्या गुन्हेगारीच्या गुलदस्त्यात दडून राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर मुंबईतल्या मातब्बर पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळणार आहेत. त्याचबरोबर टायगर मेमन हा नक्की कोण होता? त्याने हे सर्व का केले? टायगर मेमन आणि दाऊदचा नक्की काय संबंध होता? ह्या गोष्टींचा व्यवस्थित उलगडा होईल.

१९९३ साली घडलेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेली जीवितहानी आजही आपण विसरलेलो नाही… आणि या जन्मात तरी विसरणार नाही. १९९३ च्या बॉम्बस्फोटांनी मुंबई शहर बेचिराख करून सोडले होते. अनेकांनी आपले मित्र,नातेवाईक, जवळची व्यक्ती या हल्ल्यात गमावली. तेव्हा सामान्य नागरिक रस्त्यावर यायलासुद्धा घाबरत होते. ज्यांना याची झळ लागली त्यांच्यासाठी हा हल्ला मरणप्राय होता… आजही आहेच; मात्र इतर लोक ज्यांना प्रत्यक्ष झळ लागली नव्हती, ती सर्वजण वृत्तपत्रं आणि वृत्त वाहिनींवर झालेला घटनेचा प्रादुर्भाव पाहून असुरक्षितेच्या भावनेने ग्रासलेले होते. जितका हा हल्ला अनपेक्षित आणि धक्कादायक लोकांसाठी होता; तितकाच तो महाराष्ट्र पोलिसांसाठीही होता. ह्या हल्ल्याने सुरक्षिततेचे अनेक प्रश्न उभे केले होते. केवळ मुंबईच नव्हे तर अख्खा भारत हादरला होता. भारताची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे कोलमडून गेली होती. हा तपास अत्यंत महत्वाचा होता कारण अनेकांनी नाहक आपला प्राण गमावला होता …या बॉमस्फोटांमध्ये अनेकांचे अक्षरशः चिथडे चिथडे उडाले होते.. मृतदेहांचे अवशेष गोळा करावे लागत होते … आणि हे सर्व टायगर मेमन मुळे झाले होते आणि या अश्या गुन्हेगाऱ्यापर्यंत पोहचण्याचा मुंबई पोलिसांचा हा महत्वपूर्ण प्रवास आपल्याला येत्या शुक्रवारी दि. ९ डिसेंबर आणि शनिवारी १० डिसेंबरला रात्री ९ वाजता ” शौर्य – गाथा अभिमानाची ” हि मालिका झी युवावर पाहायला मिळणार आहे. एक असे सत्य जे प्रत्येक भारतीयाने अनुभवणे महत्वाचे आहे आणि ह्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या अनेक निरपराध नागरिकांची पुन्हा एकदा आठवण काढणेही तेवढेच महत्वाचे आहे.

या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.