भारदस्त आवाजाच्या ‘त्या’ व्यक्तिमत्त्वाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, र. धों.कर्वे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यासारख्या दिग्गजांचा सहवास मिळाला. आजवर त्यांनी हजारो जाहिराती व माहितीपटांना आवाज दिला. आकाशवाणीप्रति आपली निष्ठा आजन्म ठेवलेले आणि आकाशवाणीचा चालताबोलता इतिहास असलेले बाळ कुडतरकर हे आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत. वयाच्या ९५ व्या वर्षांत असलेल्या कुडतरकर यांच्याबरोबरच्या गप्पा म्हणजे माहिती, किस्से, आठवणी यांचा प्रचंड मोठा खजिनाच आहे. या वयातही तोच भारदस्त, दमदार आवाज, स्पष्ट आणि खणखणीत शब्दोच्चार आणि उत्साहाने किती सांगू व काय सांगू असे बोलणे, त्यामुळे या गप्पा रंगतच गेल्या..

[jwplayer f2HtZAlb]

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
mira road, Young college going girl, Dies, Tragic Two Wheeler Accident, accident in mira road, dies student in accident, two wheelar accident mira road, accident news,
दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
art
कलाकारण: इथं नव्हतं आरक्षण; तरी दिसलेच गुण!

बाळ कुडतरकर म्हणजे आवाजाच्या क्षेत्रातील ‘दादा.’ विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचे डबिंग असो. भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर त्यांनी  आवाजाच्या जगावर राज्य निर्माण केले. आपला स्वतंत्र ठसा उमटविला.

बाळ कुडतरकर हे आकाशवाणीवर ७ जून १९३९ मध्ये नोकरीला लागले. ‘आर्टिस्ट’ म्हणून लागलेले कुडतरकर ‘कार्यक्रम निर्माता’ म्हणून वयोमानानुसार निवृत्त झाले. आकाशवाणीच्या या दीर्घसेवेत त्यांनी आकाशवाणीसाठी आपले तन, मन वाहिले. बाळ कुडतरकर म्हणजे आकाशवाणीचे कार्यक्रम लोकप्रिय करणारा हुकमी एक्का असे समीकरण त्या काळात तयार झाले होते. ‘गंमत जंमत’, ‘कामगार सभा’, ‘वनिता मंडळ’ हे कार्यक्रम लोकप्रिय करण्यात कुडतरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या  संकल्पनेतून तयार झालेल्या ‘पुन्हा प्रपंच’ या कार्यक्रमाने तर इतिहास घडविला. स्वत: बाळ कुडतरकर, नीलम प्रभू व प्रभाकरपंत जोशी यांचा या कार्यक्रमात सहभाग असायचा. हे तिघेही त्या काळातील ‘रेडिओ स्टार’ होते. मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी कुडतरकर यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार झाले. त्यातील एक सत्कार तर खुद्द भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या रोहा या गावी त्यांच्या घरी झाला होता.

‘पुन्हा प्रपंच’च्या ‘स्मरणरंजना’च्या आठवणींचा पट उलगडताना कुडतरकर म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवनातील प्रसंग व घटना यावर आधारित मराठी भाषेत एखादा कार्यक्रम तयार करण्यात यावा, अशी सूचना दिल्लीहून आली होती. कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली तेव्हा मी आमच्या वरिष्ठांना मला विषयाचे स्वातंत्र्य द्या. हा कार्यक्रम लोकप्रिय झाला नाही किंवा कार्यक्रमाबाबत तक्रारी आल्या तर मी माझा राजीनामा देईन, असे नम्रपणे सांगून हे आव्हान स्वीकारले. लेखक आणि नाटककार शं. ना. नवरे हे माझे मित्र. ते तेव्हा मंत्रालयात नोकरी करत होते. दररोज डोंबिवलीहून मुंबईपर्यंत उपनगरी गाडीतून त्यांचा प्रवास व्हायचा. हा कार्यक्रम म्हणजे नाटक नाही, यात नाटकी संवाद नको. दररोजच्या प्रवासात तुम्ही जे ऐकाल, सर्वसामान्य प्रवासी जे बोलतात, गप्पा मारतात त्याचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटले पाहिजे, असे मी त्यांना सांगितले.  नवरा-बायको आणि त्यांचे वयस्कर शेजारी अशी पात्र योजना ठरवून कार्यक्रम ‘प्रपंच’ या  नावाने प्रसारित व्हायला लागला. श्रोत्यांना तो आवडलाही. पण तीन महिन्यांनंतर अंतर्गत राजकारणातून तो बंद केला गेला. कार्यक्रम बंद झाल्यानंतर तो का बंद झाला म्हणून आकाशवाणीकडे श्रोत्यांची अनेक पत्रे आली. त्याची दखल घेऊन तो पुन्हा सुरू झाला तेव्हा मी त्याचे नाव ‘पुन्हा प्रपंच’ असे ठेवले आणि ‘पुन्हा प्रपंच’ने पुढे इतिहास घडविला.

‘वनिता मंडळ’, ‘कामगार सभा’, ‘गंमत जंमत’ या लोकप्रिय कार्यक्रमांची जबाबदारीही कुडतरकर यांनी अनेक वर्षे सांभाळली. ‘वनिता मंडळ’चे नाव सुरुवातीला ‘महिला मंडळ’ असे द्यायचे ठरले. तेव्हा या नावाला कुडतरकर यांनी विरोध केला. आकाशवाणी हे शब्द आणि उच्चाराचे माध्यम आहे. केवळ शब्द आणि आवाजाच्या सामर्थ्यांवर श्रोत्यांपर्यंत कार्यक्रम पोहोचविण्याचे आव्हान असते. अशा वेळी काही शब्दोच्चार चुकीचे उच्चारले गेले तर ते योग्य नाही, असे कुडतरकर यांचे मत होते आणि आजही आहे. ‘महिला’ हा शब्द स्पष्ट आणि योग्य प्रकारे उच्चारला गेला नाही तर तो ‘मैला’ असा चुकीच्या पद्धतीने श्रोत्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे कार्यक्रमाचे नाव ‘वनिता मंडळ’ असे त्यांनी केले. मुंबईत ‘वनिता आश्रम’ या नावाची एक संस्था काम करत  होती. त्यावरून त्यांना हे नाव देण्याची कल्पना सुचली. ‘कामगार सभा’ या कार्यक्रमासाठी मुंबईतील २८ कामगार कल्याण केंद्रांत ते स्वत: गेले. कामगार आणि संबंधितांशी बोलून कामगारांशी निगडित असे अनेक विषय त्यांनी या कार्यक्रमात हाताळले. प्रत्यक्ष कामगारांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. तेव्हा मुंबईत गिरणी कामगारांची संख्या खूप मोठी होती. कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न यात मांडले गेल्याने कामगारांमध्ये हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. लहान मुलांसाठी असलेल्या ‘गंमत जंमत’ या कार्यक्रमाचे प्रसारण त्यांनी राणीची बाग, गिरगाव चौपाटी येथून करून एक नवीन प्रयोग केला. दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्या काळात ‘युद्धवार्ता’ कार्यक्रम  करायची कल्पना ब्रिटिश सरकारने मांडली. मुंबईतील माहिती केंद्राचे संचालक म्हणून क्लॉड स्कॉट्स हे तेव्हा काम पाहात होते. क्लॉड यांनी त्यांना इंग्रजी संहिता दिली आणि मराठी भाषांतर करून आण म्हणून सांगितले. कुम्डतरकर यांनी ते आव्हानही स्वीकारले. दहा मिनिटांच्या या माहितीपटाचे भाषांतर आणि आवाज देण्याचे मानधन म्हणून कुडतरकर यांना त्या काळात ३०० रुपये मिळाले होते.  पुढे अनेक ‘युद्धवार्ता’सह फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक माहितपटांना कुडतरकर यांचाच ‘आवाज’ मिळाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खारेपाटणजवळील सोनाळे हे कुडतरकर यांचे मूळ गाव. २१ ऑगस्ट १९२१ ही त्यांची जन्मतारीख. कोकणात त्या वेळी शिक्षणाची चांगली सोय नसल्याने कुडतरकर यांची आई कृष्णाबाई त्यांना (तसेच कुडतरकर यांच्यापेक्षा मोठा व धाकटा असे दोघे जण) अशा तीन मुलांना घेऊन मुंबईत आली. कुडतरकर यांचे वडील मुंबईतच नोकरी करत होते. नाना शंकरशेट चौकातील इराणी इमारतीत कुडतरकर कुटुंबीय राहायला लागले. गिरगावातील राममोहन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९३९ मध्ये तेव्हाच्या ‘बॉम्बे युनिव्हर्सटिी’ची मॅट्रिकची परीक्षा दिली. शाळेत असताना कुडतरकर यांची चित्रकला चांगली होती. शाळेतील शिक्षकांनी मॅट्रिकनंतर ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी ‘जेजे’त प्रवेश घेतला. एक दिवस ते ‘ऑल इंडिया रेडिओ’वर त्यांच्या ओळखीचे मोहन नगरकर यांना भेटायला मरिन लाइन्स येथे ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या कार्यालय व स्टुडिओत गेले. ते सर्व पाहून कुडतरकर थक्क झाले. योगायोगाने तेव्हा कुडतरकर यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. रेडिओचे तेव्हाचे संचालक झेड. ए. बुखारी यांनी कुडतरकर यांचे काम पाहून ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये नोकरी करणार का? अशी विचारणा केली. महिन्याला ४५ रुपये वेतन ठरले आणि कुडतरकर ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या

सेवेत ७ जून १९३९ मध्ये दाखल झाले. सेवेत असताना जी जी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली ती ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. नोकरीच्या काळात त्यांना मोठय़ा पगाराच्या काही संधी चालून आल्या. याबाबतचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, सुशीलकुमार शिंदे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना त्यांनी मला रेडिओची नोकरी सोडा आणि राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक म्हणून आमच्याकडे रुजू व्हा, असा निरोप पाठवला. मी रेडिओ सोडून कुठेही जाणार नाही. मला शेवटपर्यंत रेडिओतच काम करायचे आहे, असे नम्रपणे त्यांना सांगून ते पद स्वीकारायला मी नकार दिला.

पाश्र्वनाथ आळतेकर हे आवाजाच्या क्षेत्रातील कुडतरकर यांचे गुरू व मार्गदर्शक. त्यांच्या तसेच नानासाहेब फाटक यांच्याही नावाने अनेक वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘अभिनय’ या नावाची नाटय़संस्थाही त्यांनी काही काळ चालविली. ‘संगीत अमृतमोहिनी’ हे नाटय़संस्थेतर्फे सादर झालेले शेवटचे नाटक. शब्दोच्चार आणि शुद्ध व प्रमाणित भाषा कशी बोलायची याबाबतीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्यावर मोठे ऋण असल्याचे ते सांगतात. ‘ऑल इंडिया रेडिओ’चे तेव्हाचे संचालक झेड. ए. बुखारी यांचे रेडिओला लोकप्रिय करण्यात आणि सर्वसामान्य जनमानसात त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. बुखारी यांच्यामुळेच मी रेडिओत नोकरी करत असतानाही माहितीपट आणि जाहिरातींना आवाज देण्याचे काम करू शकलो, असेही कुडतरकर यांनी आवर्जून सांगितले.

कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन कराच. पण त्याचबरोबर ते योग्य दिशेने करतो आहोत की नाही तेही पाहा. जे कराल ते विचारपूर्वक करा. वावगे आणि चुकीचे वागू नका. मी काय तो शहाणा असे पहिल्यांदा मनातून काढून टाका. जगात अनेक शहाणी माणसे आहेत त्यांच्यापासून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

गप्पांचा समारोप करताना आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना रेडिओने काय दिले, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ऑल इंडिया रेडिओ’ने मला सर्वस्व दिले. मला घडविले, प्रसिद्धी व यश दिले. आज मी जो कोणी आहे, तो केवळ आणि केवळ रेडिओमुळेच आहे. रेडिओ म्हणजे माझा श्वास आणि जगणे आहे..

[jwplayer gSSKhmYu]