बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा १९८७ मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा आजही तेवढाच पसंत केला जातो. तरीही दिग्दर्शक शेखर कपूर यांना या सिनेमाचा सिक्वल लवकरात लवकर यावा असे वाटते. शेखर यांनीच या ‘मिस्टर इंडिया’चे दिग्दर्शन केले होते. ते म्हणाले, ‘मला वाटतं की दुसरा दिग्दर्शक नक्कीच हा सिनेमा करेल. स्वतः बोनी आणि अनिल कपूर यासंदर्भात चर्चादेखील करत आहेत. जर सिक्वल होणारच असेल तर एका नवीन दिग्दर्शकानेच तो करावा असं मला वाटतं.’

‘अनेक लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की पुन्हा एकदा ‘मिस्टर इंडिया’ सिनेमा करु आणि अवघ्या तीन आठवड्यांमध्ये ३०० कोटी रुपयांची कमाई करु. यावर मग मी बोलताना सहज सांगतो की हा सिनेमा ३० वर्षे चालला आणि तुम्ही फक्त तीन आठवड्यांची वार्ता करता’, असेही ते पुढे म्हणाले.

‘आता सिनेनिर्मितीचं संपूर्ण स्वरुपच बदललंय. सिनेमा जास्तीत जास्त दिवस चालेल हा विचार मनात ठेवून आम्ही दिग्दर्शन करायचो. त्यामुळे आता कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त कमाई करणारे सिनेमे आम्ही करु शकू याची मला खात्री नाही. म्हणूनच एका नवीन दिग्दर्शकाने या सिनेमाचे दिग्दर्शन करावे असे मला वाटते. सध्या शेखर त्यांच्या ‘लिटिल ड्रॅगन’ या सिनेमाच्या बांधणीमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय श्रीकृष्णावर एखादा सिनेमा तयार करण्याचे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न असल्याचे शेखर कपूर यांनी सांगितले.