शास्त्रीय संगीतकार हरिप्रसाद चौरसिया आणि पं.शिवकुमार शर्मा हे चित्रपटसृष्टीच्या सद्य स्थितीवर नाखुश आहेत. तसेच, त्यांनी आताच्या गाण्यांचे जीवनमान कमी असल्यामुळे त्यावर खेद व्यक्त केला आहे.
पं.शिवकुमार शर्मा म्हणाले की, आताच्या संगीताचे जीवनमान फार कमी आहे. जुनी गाणी लोकांच्या लक्षात असून ती अजूनही पसंत केली जातात. आताच्या कोणत्याही गाण्याने माझे लक्ष वेधले असेल याबाबत मला शंका आहे. सध्याची गाणी ही प्रेक्षकांची मागणी असल्याचे म्हटले जाते. पण, मी याच्याशी सहमत नसून संगीत क्षेत्रात संस्मरणीय राहतील अशी गाणी तयार करता येऊ शकतात, असे मला वाटते. बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण, मला अजूनही त्या काळातील जुनी गाणी आवडतात. मी तीच गाणी गात असून आताची गाणी गुणगुण्याची इच्छा मला होत नाही. संगीत क्षेत्रात प्रतिभावान कलाकार आहेत त्यामुळे गाण्यांध्ये चांगला बदल दिसेल अशी आशा असल्याचे पं.शर्मा म्हणाले. शिव-हरी या जोडीने सध्या कोणत्याही नवीन अल्बमसाठी एकत्र काम करण्याची योजना केलेली नसून त्यांचे इतर गाण्यांचे कार्यक्रम सुरु आहेत.
बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया आणि संतूर वादक पं.शिवकुमार शर्मा या ‘शीव-हरी’ जोडीने ‘सिलसिला’ (१९८०), ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) आणि इतर काही चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे.