विनोदी भूमिका करणे हे सोपे नसतं. विनोदालाही एक लय, वेळ आणि निश्चित परिमाण असतं. ‘ह्युमर इज अ सिरिअस जॉब’ आणि विनोद गंभीरपणेच केला पाहिजे, असं मत मराठी चित्रपटसृष्टीतील मामा म्हणजेच अशोक सराफ यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’मध्ये व्यक्त केलं. अशोक सराफ यांचा ‘शेंटिमेंटल’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटीलसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. दोघांनीही प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

चित्रपटातील अनेक गमतीजमती, किस्से अशोक सराफ यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘पोलीस हा सुद्धा एक माणूस आहे असं समजून वागा. पोलिसांशी शेंटिमेंटल होऊन वागा हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केलाय.’ ‘शेंटीमेंटल’चं काही चित्रीकरण बिहारमध्ये करण्यात आलं. कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून बिहारमध्ये गंगेच्या घाटाजवळ चित्रीकरणाचा अनुभव अनोखा होता, असे ते म्हणाले.

अशोक सराफ यांनी दादा कोंडके आणि निळू फुले या दोन्ही दिग्गजांसोबत काम केलं. त्याचप्रमाणे त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डेची जोडी हिट ठरली. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, ‘दादा कोंडके यांच्यासोबत काम करताना नेहमीच सेटवर हसतंखेळतं वातावरण असायचं आणि लक्ष्मीकांत हा हरहुन्नरी आणि साफ मन असलेला नट होता. तो अत्यंत साधासुधा आणि नेहमीच आदराने वागणारा माणूस होता. हे सर्वच लोकांना जमत नाही.’

VIDEO : ‘शेंटिमेंटल’चा शॉलिड ट्रेलर पाहिलात का?

अभिनयासोबतच फिटनेसवरही तितकाच भर देत असल्याचं अशोक सराफ यांनी सांगितलं. सध्याच्या कॉमेडी शोबद्दलही त्यांनी आपलं मत मांडलं. ‘आत्ताचे कॉमेडीयन चांगले आहेत. मात्र कला सादर करण्याच्या पद्धतीत काही वेळा गफलत होते, तेवढं फक्त सांभाळायला पाहिजे,’ असं ते म्हणाले. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात आणि यशात त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांचाही तितकाच मोठा वाटा आहे. ‘ती बोलते म्हणून मी ऐकतो. माझ्यासाठी कुठलीही गोष्ट करण्यास तयार असणारी व्यक्ती म्हणजे माझी बायको. मी तिचा गुरु आणि काही बाबतीत तीसुद्धा माझी गुरू आहे,’ अशा शब्दांत त्यांनी निवेदिता यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं.

येत्या २८ जुलैला ‘शेंटीमेंटल’ सिनेमा प्रदर्शित होत आहे.