ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ज्या बिग बजेट चित्रपटांचा धमाका होणार.. होणार. अशी चर्चा होती. अखेर ते चित्रपट आज आमनेसामने येऊन ठाकले आहेत. हा आठवडा पूर्णपणे ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ या दोन हिंदी चित्रपटांचा आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’

या आठवडय़ातच नव्हे तर गेल्या महिन्याभरात ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली तो करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीची सुरुवात झाली तेव्हा खरेतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर क पूर यांच्यातील प्रणयदृश्ये हा लोकांसाठी औत्सुक्याचा विषय होता. मात्र उरी हल्ल्यानंतर या चित्रपटावरचा प्रणयी रंग उडाला आणि फवाद खानच्या भूमिकेमुळे रागाचे सूर आळवले गेले. वादविवाद-सल्लामसलतीतून बाहेर पडून चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मैत्री, एकतर्फी प्रेम अशा विषयांवर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. दिग्दर्शक म्हणून नातेसंबंधांचे विषय नाजूकपणे हाताळण्यात करण जोहरचा हातखंडा आहे. त्यामुळे एका गॅपनंतर दिग्दर्शक म्हणून समोर येताना ऐश्वर्या-रणबीर आणि अनुष्का अशी अफलातून कास्ट त्याने बांधून घेतली आहे. चित्रपटातील गाणीही आधीच लोकप्रिय ठरली आहेत. आता केवळ चित्रपटामागे लागलेली मुश्कील सुटून त्याला प्रेक्षकांची दिलसे पसंती मिळणार का? हा प्रश्न आहे.

‘शिवाय’

‘शिवाय’ हा अजय देवगण अभिनीत आणि दिग्दर्शित चित्रपट आहे. संपूर्णपणे बल्गेरियाच्या पर्वतराजींमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. दिग्दर्शक म्हणून कलाकारांना घेऊन बर्फाळ पर्वतांमध्ये चित्रीकरण करणे हे आव्हान होते. आणि त्यासाठी गेले दीड-दोन वर्षे अजयची टीम अथकपणे काम करत होती. अजयचा चित्रपट असल्याने तो अ‍ॅक्शनपट आहे. त्याचवेळी गुंतागुंतीची कौटुंबिक कथाही त्याला जोडली आहे. यात अजयबरोबर साएशा सैगल ही नवोदित अभिनेत्री काम करत असून एरिका कार या पोलिश अभिनेत्रीचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. अजयच्या मुलीच्या भूमिकेत एबीगेल एम्स ही हॉलीवूडची बालकलाकार काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाची सगळी मदार अर्थातच अजय देवगणवर आहे.