अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त चार दिवस राहिले असताना अजयने या सिनेमाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित केला आहे. या सिनेमाचे प्रमोशन अजय अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करणार असे दिसत आहे. अजयसाठी हा फार महत्त्वकांशी प्रोजेक्ट आहे. या सिनेमातून अजय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडिया आणि यूट्युबवर या सिनेमाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित केले जात आहेत. करण जोहरचा बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे शिवायला ‘काटें की टक्कर’ मिळणार आहे यात काही शंका नाही. आतापर्यंत सिनेनिर्माते साधारणतः पहिला ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर काही दिवसांतच दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करतात. ‘शिवाय’ने यावेळी वेगळा प्रयोग करण्याचे ठरवलेले दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला अगदी ४ दिवस राहिले असताना अजयने हा दुसरा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. कदाचित लोकांच्या मनात ‘शिवाय’बद्दल अधिक आकर्षण निर्माण व्हावं हा हेतूही असू शकतो.

सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरच्या तुलनेत हा दुसरा ट्रेलर थोडा वेगळा आहे. पहिला ट्रेलर अॅक्शन आणि रहस्यांनी परिपूर्ण असा होता, तर या दुसऱ्या ट्रेलरमध्ये कौटुंबिक कोलाहल आणि वडील-मुलीच्या नात्यातली गुंतागुत दाखवण्यात आली आहे. अजय या ट्रेलरमध्ये आपल्या मुलीला हेलीकॉप्टरमधून होणाऱ्या गोळीबारापासून वाचवताना दिसत आहे. तर दुसरीकडे तिच्याबरोबर तेवढीच मजामस्ती करतानाही दिसतो. ‘शिवाय’ हा सिनेमा ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमासोबतच २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला सिनेमात घेतल्यामुळे ‘ऐ दिल है..’ला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. यामुळे हा सिनेमा चर्चेतही आला होता त्यामुळे चर्चेत येण्याचा फायदा कदाचित ‘ऐ दिल है..’ ला होऊ शकतो.

‘शिवाय’ सिनेमात अजय एरिका कार या अभिनेत्रीसोबत दिसणार आहे. अजयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्वघोषित सिनेसमीक्षक केआरकेचा एक ऑडिओ शेअर केला होता. ज्यात तो स्पष्टपणे सांगताना ऐकू येत आहे की, त्याने करण जोहरकडून ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी २५ लाख रुपये घेतले असल्याचे कबूल केले आहे. याशिवाय अजय तर त्याचा फोनही उचलत नाही अशी तक्रारही त्याने या ऑडिओ क्लिपमध्ये केली होती. पण नंतर या प्रकरणावर फार वाच्यता झालीच नाही आणि फवाद खानचा विषय चर्चेत आला.