‘सैराट’ चित्रपटाने करमाळा आणि त्याच्या बाजूचा परिसर प्रसिद्धीच्या झोतात आणला. त्याचप्रमाणे कळवण तालुक्यातील कातळगावही चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या पडद्यावर झळकणार आहे. तरुण निर्माता अंजनेय साठे व दिग्दर्शक सुमीत संघमित्र यांनी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या मदतीने ग्रामीण बाज असलेला मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा केला आहे. ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी होत आहे. ४० दिवस हे चित्रीकरण पाहण्याची संधीत ग्रामस्थांना मिळणार आहे.

चित्रपटासाठी मोठी शहरे, झगमगाट आवश्यक नसून ग्रामीण बाज, तेथील काही ठिकाणांचा आधार घेत एक उत्तम चित्रपट आकारास येऊ शकतो.  हेच समीकरण लक्षात घेऊन अंजनेय साठे व दिग्दर्शक सुमीत संघमित्र यांनी कातळगाव चित्रपटातून दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.

निसर्गाची मुक्त उधळण झालेल्या कळवण तालुक्यातील कातळगांव येथे या चित्रीकरणास सुरुवात झाली आणि बघ्यांनी नेमके काय सुरू आहे हे पाहण्यास गर्दी करण्यास सुरूवात केली. आदिवासीबहुल परिसरात कॅमेरा, पडद्यावर दिसणारे कलाकार मंडळी हे सारे वातावरण तसे नवखे आहे. चित्रपटाचा काही भाग हा सप्तश्रृंगी गडावर चित्रीत करण्यात आला. निर्माते अंजनेय मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

चित्रपटात ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, किशोर कदम, उषा नाईक, अतुल परचुरे या दिग्गज विनोद वीरांसह मुख्य अभिनेता म्हणून ओम भूतकर काम करत आहे. चित्रीकरण पुढील ४० दिवस सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत कातळगांव, नांदुरी, अभोणा, कुंडाणे, भेंडी या ठिकाणी होणार आहे.

दरम्यान, टीव्हीवर दिसणारी ही मंडळी आपल्या सभोवताली फिरतांना पाहतांना अनेकांना त्यांच्या सोबत ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरला गेला नाही. भ्रमणध्वनीत नाही तर किमान त्यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित नसले तरी अस्सल ग्रामीण बाज, तेथील प्रश्नांवर आधारित हा चित्रपट लोकांना आवडेल असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला.

आदिवासी भागातील बारीकसारीक गोष्टींचे चित्रण चित्रपटात पाहावयास मिळणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कळवण आदिवासी तालुका एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

चित्रपटामुळे रोजगार मिळाला

आमच्या गावात चाललेल्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला आणि माझ्या १०  मित्रांना येथे ‘स्पॉट बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यामुळे गावातच चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच चित्रीकरणाचा आनंद जवळून अनुभवता येत आहे.

प्रकाश बहिरम (कातळगाव)

पर्यटन स्थळांचा विकास व्हावा

कळवण तालुक्यातील चणकापूर, धनोली, भेगु, पुनद नगर यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे मराठी व हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी पोषक आहेत. निर्मात्यांनी तालुक्यातील इतर ठिकाणांचा शोध घेऊन त्याच्या विकासाबाबत लक्ष द्यायला हवे.

चेतन हिरे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्था)