भारताचा टेनिसपटू लिएँडर पेस आणि मॉडेल रिया पिल्लई यांच्यातील कायदेशीर वाद अद्यापही सुरूच आहेत. लिएँडरने त्याचा पासपोर्ट सादर करावा यासाठी रियाने न्यायालयात आता नवीन अर्ज सादर केलाय. पेसच्या आधीच्या पासपोर्टमध्ये पत्नी म्हणून रियाच्या नावाचा उल्लेख असून, आताच्या पासपोर्टमधून तिचे नाव वगळण्यात आल्याचा तिचा दावा आहे.

रियाने पेस आणि तिचे लग्न झाल्याचा दावा केला होता. तर पेसने आपण लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे सांगत तिचा हा दावा फेटाळून लावला होता. यावरून आता या दोघांमध्ये कायदेशीर लढाई जुंपली आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारी २००८ मध्ये पेसने काढलेल्या पासपोर्टवर पत्नीच्या नावाच्या रकान्यात रियाचे नाव होते. त्याच्या या पासपोर्टची मुदत १८ फेब्रुवारी २०१८ ला संपणार होती. मात्र, २०१४ मध्ये त्याने नव्याने काढलेल्या पासपोर्टमध्ये रियाच्या नावाचा उल्लेख नाही.

वाचा : ‘स्टार किड’ला मागे टाकत नवअभिनेत्रीने मिळवला १५० कोटींचा चित्रपट

अमेरिकेत असताना आपला पासपोर्ट हरवल्याचे पेसचे म्हणणे आहे. तर, त्याने जाणूनबुजून माझे नाव हटवल्याचे रियाने म्हटले. तसेच, पासपोर्ट हरवल्यावर केलेल्या तक्रारीची कागदपत्रे आणि त्यासाठी दिलेले पुरावे लिएँडरने आपल्यासमोर सादर करावेत असेही रियाचे म्हणणे आहे. स्वतःची बाजू मांडताना रियाने घरखर्च आणि लिएँडरला दिलेले पैसे याचा हिशोब दाखवण्यासाठी तिचे बँक स्टेटमेण्ट्स, काही पावत्या आणि बिलं न्यायालयासमोर सादर केली. हे पैसे तिला अद्यापपर्यंत न मिळाल्याचेही तिने नमूद केले.

वाचा : … म्हणून दाऊदच्या नातेवाईकाची ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री

२००९ मध्ये लिएँडरपासून वेगळं झाल्यापासून स्वत:चा आणि मुलीचा संपूर्ण खर्च रिया एकटीच करते आहे. लिएँडरने २०१४ मध्ये महिन्याला दीड लाख रुपये देण्यास सुरूवात केली होती. पण त्यानंतर त्याने हे पैसे देण्यासही नकार दिला. गेल्याच आठवड्यात रियाने तिच्या आणि मुलीच्या संगोपनासाठी पेसकडून महिना २.६२ लाख रुपयांची मागणी केली. यापैकी १.८७ लाख रुपये हे मुलीच्या वैद्यकीय उपचारांसाठी आणि उरलेले ७५ हजार रुपये इतर खर्चांसाठी लागणार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले.