श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि खूशी कपूर दोघीही बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच सोशल मीडियाच्या स्टार झाल्या आहेत. हे स्टारपण मिळण्याचे खरे श्रेय श्रीदेवी आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांचेच आहे. श्रीदेवीच्या मुली सोशल मीडियापासून दूर असल्या तरी मनिष मल्होत्राच्या इन्टाग्रामवरुन श्रीदेवीसह तिच्या दोन्ही मुलींची झलक बऱ्याचदा पाहायला मिळत असते. नुकतेच मनिषने जान्हवी, श्रीदेवी आणि खूशी कपूर यांचे एकत्रितपणे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका कार्यक्रमासाठी मनिषने श्रीदेवीसह तिच्या दोन मुलींसाठी खास ड्रेस डिझाइन केले होते. हे ड्रेस परिधान केलेले फोटो मनिषने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या या फोटोंची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे. या ड्रेसमधील श्रीदेवीसह तिच्या दोन मुलींचा लूक हा लक्ष वेधून घेणारा असाच आहे. श्रीदेवी, जान्हवी आणि खूशी तिघी या फोटोमध्ये पांढरा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. नक्की कोणत्या कार्यक्रमासाठी हा ड्रेस मनिषने डिझायन केले आहेत याची कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सोशल मीडियावर सध्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

सध्याच्या घडीला श्रीदेवीच्या मुली रुपेरी दुनियेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनल्या आहेत. जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा रंगत आहेत की, जान्हवी कपूर लवकरच ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असल्यामुळे सध्या अनेकांच्याच नजरा या आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरीही ‘आर्ची’च्या भूमिकेसाठी जान्हवीचे नाव पुढे येत आहे. याआधी बॉलिवूडच्या बऱ्याच कार्यक्रमांना श्रीदेवीसह तिची मुलगी जान्हवी दिसायची. पण हल्ली मात्र असे होत नाही. जान्हवीला अभिनेत्री म्हणून पाहण्यासाठी रसिकांमध्ये उत्सुकता वाढावी यासाठी श्रीदेवीने ही शक्कल लढवल्याची देखील चर्चा रंगली होती.

जान्हवी नेहमीच नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासोबतच्या फोटोमुळे चर्चेत राहिली आहे. जान्हवीला स्टाइल आणि फॅशन तिच्या आईकडूनच (श्रीदेवी) मिळाली आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा तथाकथित प्रियकर शिखर पहरीया याच्यासोबतचा एक व्हिडिओदेखील मनिष मल्होत्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.