‘नदी वाहते’ सप्टेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘श्वास’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. संदीप सावंत यांचा ‘श्वास’नंतर तब्बल बारा वर्षांनी ‘नदी वाहते’ हा नवा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.

आताच्या काळात आपल्या गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर ‘नदी वाहते’ बेतला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांच्या ‘सहज फिल्म्स’ निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, नीरज व्होरालिया यांनी संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा नीरजा पटवर्धन यांनी केलं आहे.

‘श्वास’नंतर माझ्या मनासारखा चित्रपट करण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या. ‘नदी वाहते’ हा चित्रपट करण्यासाठी बराच काळ आर्थिक तजवीज करण्यात गेला. त्याशिवाय नदीवरचा चित्रपट करताना, त्यात संशोधनाचा भाग मोठा होता. पूर्ण अभ्यास करून हा चित्रपट केला आहे. नदी, पर्यावरण व शाश्वत विकास या विषयातील तज्ज्ञ, यात काम करणारे अशा अनेकांच्या सहभागातून हा चित्रपट उभा राहिला आहे. एक महत्त्वाचा विषय या निमित्तानं हाताळला गेला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत आहे,’ असं संदीप सावंत यांनी सांगितलं.