हिंदी वाहिन्यांवरच्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये मराठी कलाकारांना त्यांचे जलवे दाखवायची संधी फार क मी वेळा मिळते, पण जेव्हा जेव्हा ती मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी या संधीचे सोने केले आहे. त्यामुळे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरच्या ‘नच बलिए’ या लोकप्रिय नृत्याआधारित रिअ‍ॅलिटी शोमध्ये दोनदा मराठी कलाकारांची जोडी झळकली आणि दोन्ही वेळा या शोचे विजेतेपद त्यांनी आपल्या खिशात घातले. या शोचे आठवे पर्व पुढच्या महिन्यात सुरू होते आहे आणि या शोमध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याची पत्नी तृप्तीसह नृत्यकौशल्य दाखवणार आहे. सिद्धार्थच्या विनोदगुणाचा रंग याआधी रिअ‍ॅलिटी शोमधून पाहायला मिळाला आहे, मात्र आपल्या नृत्यानेही प्रेक्षकांची मने जिंकून ‘नच बलिए’च्या मराठी विजयाची हॅटट्रिक साधणार का? याबद्दल खरी उत्सुकता आहे.

पुन्हा एकदा ‘नच बलिए’ टीमकडून हा शो एप्रिलमध्येच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा मात्र तृप्तीने हा शो आपण करूयाच, असा आग्रह धरला. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मी या शोमध्ये सहभागी होतो आहे, असे सिद्धार्थने ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना सांगितले. योगायोगाने एप्रिलमध्ये हा शो सुरू होतो आहे आणि मे महिन्यात सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या सहजीवनाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दहा वर्षांमध्ये आम्हाला दोघांना एकत्र इतका वेळ कधीच मिळाला नव्हता. एरव्ही कुठल्याही कार्यक्रमाला जाताना तृप्ती नेहमी बरोबर असते. पण आम्हाला दोघांनाही एकत्र काम करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. या शोच्या निमित्ताने आम्ही खूप वेळ एकत्र असतो, तालीम करतो, नवीन शिकतो आहोत. या शोच्या प्रवासाचा जो आनंद आहे तो आम्ही अनुभवतो आहोत, असेही त्याने सांगितले.

‘नच बलिए’ हा नृत्यावर आधारित शो आहे. सिद्धार्थ स्वत: नृत्यात निपुण नाही. तृप्तीने भरतनाटय़मचे प्रशिक्षण घेतलेले आहे. शिवाय, कॅमेऱ्यासमोर येण्याचा अनुभवही नाही; मात्र सध्या शोमध्ये सादरीकरण कसे असेल, परीक्षकांच्या प्रतिक्रिया याचे थोडेफार दडपण असले तरी त्याचा फारसा विचार करत नसल्याचे तृप्तीने सांगितले. तर या शोसाठी नृत्यदिग्दर्शक ओमकार शिंदे आणि त्याची अफलातून टीम सध्या माझ्या नृत्यावर मेहनत घेते आहे. ओमकारने याआधीही ‘नच बलिए’ केलेले असल्याने त्याला आमच्याकडून चांगले सादरीकरण कसे करून घ्यायचे, याची कला अवगत आहे. त्यामुळे आम्ही बिनधास्त आहोत, असे सिद्धार्थने सांगितले. याआधी ‘नच बलिए’चा शो सचिन-सुप्रिया पिळगावकर जोडीने जिंकला होता.