बॉलिवूड, चित्रपट आणि प्रसिद्धी ही एक अलिखित त्रिसुत्रीच आहे. सोशल मीडियापासून ते अगदी रस्त्यावर उतरुन चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी जवळपास धडपडतच असतात. रिअॅलिटी शो, विविध कार्यक्रम आणि शक्य त्या सर्व परिंनी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी विविध चित्रपट कलाकार नेहमीच पुढे सरसावत असतात. सध्या प्रदर्शनापासून अवघे काही दिवस दूर असणाऱ्या ‘बार बार देखो’ या चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र रंगत आहे. अभिनेत्री कतरिनाच्या नव्या लूकपासून ते अगदी या चित्रपटातील धम्माल गाणीही सिनेरसिकांची दाद मिळवत आहेत. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ विविध फंडे आजमावत ‘बार बार देखो’च्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहेत.
चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान जयपूरमधील श्याम नगर मेट्रो स्थानकात ‘फ्लॅश मॉब’मध्ये या दोन्ही कलाकारंनी ‘काला चष्मा’ या गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली. कतरिना आणि सिद्धार्थने धरलेला ठेका पाहून आजूबाजूच्या प्रवाशांनीही एकच कल्ला करत त्यांना यावेळी साथ दिली. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. अशा या बहुप्रतिक्षित ‘बार बार देखो’ चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहराने केले असून करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती केली आहे. या चित्रपटाआधी सिद्धार्थ ‘कपूर अॅन्ड सन्स’ या चित्रपटात दिसला होता, तर कतरिना ‘फितूर’ या चित्रपटातून झळकली होती. आता हे दोन्ही कलाकार ‘बार बार देखो’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार असल्यामुळे बॉलीवुडमध्ये एका नव्या जोडीची भर पडणार आहे. कतरिना आणि सिद्धार्थची ‘सिझलिंग केमिस्ट्री’ असणारा ‘बार बार देखो’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.