१९८१ चा ‘सिलसिला’ आठवतोय का? रेखा आणि अमिताभचा बहूचर्चित असा हा सिनेमा कोणाच्या लक्षात नसेल तर नवलच… आज सिलसिला सिनेमाने ३५ वर्ष पूर्ण केली. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा समीक्षकांनी या सिनेमाला नावं ठेवली होती. पण आता हाच सिनेमा अनेक चांगल्या सिनेमांपैकी एक या यादीत मोडतो, असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितले.
“आज सिनेमाला ३५ वर्ष होत आहे. तेव्हा समीक्षकांनी ‘सिली- सिला’ अशा शब्दांत सिनेमावर टिका केली होती. पण आज तो एक उत्कृष्ट सिनेमांत गणला जात आहे.” असे अमिताभ म्हणाले.
यश चोप्रा दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. तेव्हा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गल्ला कमवण्यात अपयशी ठरला होता. या सिनेमाविषयी बोलताना १९८२ चा ‘खुद्दार’ सिनेमाचाही त्यांनी उल्लेख केला.
“परवीन बाबी, विनोद मेहरा आणि संजीव कुमार स्टारर हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा मी ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये होतो. कूली सिनेमामध्ये झालेल्या अपघातामुळे तिकडे उपचार घेत होतो,” असेही ते म्हणाले.
आतापर्यंत सिलसिला हा काही एकच सिनेमा नाही जो प्रदर्शनावेळी चालला नाही. ‘अंदाज अपना अपना’ हेही एक उदाहरण आहेच. तेव्हा दणदणीत आपटलेला हा सिनेमा आता मात्र टिव्हीवर लागला तरी कोणी पाहायचे सोडत नाही.