काही दिवसांपासून बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत चर्चेत आहे. पण, गेले काही दिवस चर्चांच्या वर्तुळातूनही कंगना कुठे दिसेनाशीच झाली होती. कंगनाचे हे अचानक गायब होणे अनेक प्रश्न उभे करत असतानाच सूत्रांच्या मदतीने आणि कंगनाच्या या फोटोने याबाबतचा उलगडा केला आहे. ‘क्वीन’ कंगना सध्या तिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. विविध कार्यशाळांना हजेरी लावत कंगनाने या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. एका घटस्फोटित महिलेच्या जीवनावर भाष्य करणारे कथानक या चित्रपटाद्वारे हाताळण्यात येणार आहे. हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात सध्या कंगना या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

कंगना आणि हंसल मेहता यांचा एक फोटो सध्या चित्रपट वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहताना एका क्षणासाठी फोटोतील वयोवृद्ध स्त्री खुद्द कंगनाच असल्याचे कळतच नाही. ‘सिमरन’ या चित्रपटामध्ये एका वृद्ध स्त्रीच्या भूमिकेत दिसणारी कंगना सलमान खान स्टारर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटामध्येही याच धाटणीची भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘क्वीन’, ‘तनु’ यांसारख्या विविध भूमिका चोखंदळपणे हाताळणारी कंगना ‘सिमरन’च्या निमित्ताने पुन्हा एकदा हटके पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाआधी कंगना ‘रंगून’ या चित्रपटातून झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून अभिनेता शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्यासह कंगना या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसेल.