पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ वक्तव्य करणे अभिनेता सलमान खानला चांगलेच भोवलेले दिसत आहे. एका कार्यक्रमामध्ये ‘पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, ते कलाकार आहेत. ते कलाकार अधिकृतपणे भारतात येतात. येथे काम करण्यासाठी लागणारा व्हिसा हा आपल्या सरकारकडूनच त्यांना दिला जातो. दहशतवादी आणि कलाकार यांच्यात फरक आहे. आपण दहशतवाद्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिले आहे’, असे म्हणत सलमानने त्याची भूमिका स्पष्ट केली होती.

सलमानच्या या वक्तव्यामुळे सध्या त्याला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावरही सलमानच्या या वक्तव्यावरुन अनेक चर्चा रंगत आहेत. असे असतानाच वादग्रस्त ट्विट्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या गायक अभिजीत भट्टाचार्यनेही सलमानविरोधात ट्विट केले आहे. त्यामुळे आता राजकारण्यांसह बॉलिवूड वर्तुळातही सलमानविरोधी मतं पाहायला मिळत आहेत. ‘फवादने त्याच्या देशाप्रति देशभक्ती तरी दाखवली, सलमानला तर अशी प्रामाणिकता दाखवायलाही लाज वाटत आहे. पाकिस्तानी आणि भारतीय कलाकारांमध्ये एकच साम्य आहे, दोघेही भारतातील पैसा, प्रसिद्धी आणि चाहत्यांचे प्रेम मिळवतात. पण, मुळात मात्र ते भारत विरोधी आहेत’, असे ट्विट अभिजीत भट्टाचार्यने केले आहे.

दरम्यान सलमानने पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला चांगलेच खडसावले. ‘सीमेवर जवान आपल्यासाठी लढत आहेत. त्यांनी शस्त्रे ठेवली तर सलमान खान सीमेवर जाऊन उभा राहणार आहे काय ? असा सवाल राज यांनी केला. भारतात एवढे कलाकार असताना सलमानला पाकिस्तानातील कलाकारांचा इतकाच पुळका येत असेल तर त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे असे राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सुनावले. त्यामुळे या घटनेला आता कोणते नवे वळण मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.