आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला लकी अली यांचा आज वाढदिवस. लकी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘तमाशा’ सिनेमात लकी अली यांनी गायलेले ‘सफरनामा…’ हे गाणे आजही अनेकांच्या तोंडावर आहे. त्यांनी अशा अनेक गाण्यांना आपला आवाज देऊन ती गाणी अजरामर केली आहेत.

लकी अली यांचे खरे नाव मकसूद मेहमूद अली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन मेहमूद यांचे ते सूपुत्र. पण एक वेळ अशी होती की लकी यांनी आपल्या वडिलांनाच ओळखले नाही. त्याचे झाले असे की, ११ वर्षे ते बोर्डिंगमध्ये राहत होते आणि मेहमूद हे कामात व्यग्र असल्यामुळे त्यांची भेट व्हायची नाही. लकी कुटुंबातील अनेक लोकांना ओळखायचेच नाहीत. त्यामुळे जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना ओळखलेच नाही. वडील कामात सतत व्यग्र असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी फारसा संबंध आला नाही.

लकी अली यांना पाच मुलं असून त्यांनी आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. लकी यांनी शेवटचे लग्न २०१० मध्ये इंग्लडच्या कॅट हलामशी केले. सध्या ते लाइमलाइटपासून फार दूर आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ कलाकाराची इज्जत केली जात नाही. लकी यांना एकांतात राहणं फार पसंत आहे. त्यांना स्वतःहून बॉलिवूडमध्ये पुन्हा यायचे नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

आपलं खासगी आयुष्य प्रसारमाध्यमांसमोर आणणं त्यांना फारसं पसंत नाही. म्हणूनच ते बॉलिवूडपासून दूर राहणं पसंत करतात. लकी अली यांना निसर्गाच्या सानिध्यात राहणे फार आवडते. त्यामुळेच झगमगाटापासून लांब राहून ते शेतीही करतात. त्यांचे एक कुटुंब न्युझिलंडमध्ये राहते. त्यांची एक पत्नी न्युझीलंडची असून एक मुलगा आणि मुलगी दोघेही न्युझीलंडमध्येच शिक्षण घेत आहेत. तिथेच ते छोटेखानी शेतीही करतात.

https://www.instagram.com/p/BUGVe0rhlvr/

मुलींच्या शिक्षणासाठीही त्यांना फार काही करायचे आहे. एका मुलीच्या शिक्षणाने संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. पण फक्त मुलालाच शिक्षण दिले तर तो एकटाच शिक्षित होतो. त्यांनी बंगळुरूमध्ये मुलींसाठी एक शाळा सुरू केली आहे.

https://www.instagram.com/p/uu84wSSPoj/