सर रॉजर मूर यांनी दोन दशके बाँडपटांवर राज्य केले. त्यांचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व बाँड या व्यक्तिमत्त्वावर छाप पाडून गेले. त्यांनी जेम्स बाँडच्या भूमिकेस नर्मविनोदी झालर दिली होती हे तर खरेच पण प्रेक्षकांना त्या भूमिकेत दुसरे कुणी पाहावेसेच वाटणार नाही इतका त्यांचा दोन दशके करिष्मा होता. ऑगस्ट १९७२ मध्ये शाँ कॉनरी यांनी ही भूमिका करण्यातून निवृत्ती घेतल्यानंतर मूर यांनी बाँडची भूमिका १९८५ पर्यंत केली. सहा फूट उंची, निळसर डोळे, कुरळे केस  असे नायकासाठी लागणारे सगळे गुण त्यांच्या ठायी होते. त्यांच्या अभिनयक्षमतेवर टीकाकारांनी आक्षेप घेतले, प्रसंगी टीकाही केली. पण तरीही त्यांनी त्यांच्या मर्यादा ओळखून यश मिळवले. १९२७ मध्ये त्यांचा जन्म दक्षिण लंडनमध्ये लम्बेथ, स्टॉकवेल येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण  झाले. त्यांचा ओढा कला शाखेकडे होता त्यातूनच त्यांनी सोळाव्या वर्षी शाळा सोडून लंडनच्या एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओत काम केले. तेथे त्यांना ‘तुला काही काम येत नाही’ म्हणून नाकारलं गेलं. नंतर त्यांना त्यांच्या वडिलांच्या संपर्कातून सीझर व क्लिओपात्रा या डनहॅम स्टुडिओजच्या चित्रपटात राखीव कलाकार म्हणून काम मिळाले. चित्रपट दिग्दर्शक डेस्मंड हर्स्ट यांनी त्यांना रॉयल अ‍ॅकॅडमी ऑप आर्ट या लंडनच्या संस्थेत अभिनय शिक्षणासाठी पाठवले. नंतरही त्यांच्या वाटय़ाला भूमिका येत नव्हत्या, पण त्यांची शरीरयष्टी बघून जाहिरातीत त्यांनी मॉडेल म्हणून काम केले होते. १९५३ मध्ये एमजीएम कंपनीने त्यांच्यातील बुद्धिमत्ता हेरून त्यांना अमेरिकेत बोलावले व नंतर त्यांची खरी कारकीर्द रंगली. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून नंतर ते चित्रपटांकडे वळले. द अलास्कन ही टीव्ही मालिका त्यांनी केली होती. १९६२ मध्ये त्यांना ल्यू ग्रेड यांनी द सेंट या मालिकेत भूमिका दिली. ती मालिका नंतर सात वर्षे चालली. त्याचवेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याचे लोकांना जाणवत होते. त्यातच १९७१ मध्ये त्यांना द पर्सुएडर्स या मालिकेत भूमिका मिळाली. त्यातून त्यांना नावही मिळाले. नंतर शाँ कॉनेरी यांनी बाँडपटातील भूमिका सोडल्यापासून लाइव्ह अ‍ॅण्ड लेट लाइव्ह (१९७२) ते ए व्हूय टू ए किल (१९८५) या बाँडपटात त्यांनी भूमिका केल्या.

बॉण्डकाळ!

१ ऑगस्ट १९७२ रोजी डॉर्शेस्टर हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत  रॉजर मूर नावाची घोषणा जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी झाली. १९६७ पासून इयन फ्लेमिंगच्या सिक्रेट एजंटवर आधारित ही भूमिका मला हवी होती असे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले होते. दी मॅन विथ दी गोल्डन गन , द स्पाय हू लव्हड मी, मूनरेकर, फॉर युवर आईज ओन्ली, ऑक्टोपसी, अ व्ह्य़ू टू अ कील असा त्यांचा चित्रप्रवास आहे. द स्पाय हू लव्हड मी बाँडपटाने खरे समाधान दिल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी इतरही चित्रपट सुरुवातीच्या काळात केले होते पण ते अपयश एकटय़ा बॉण्ड भूमिकेने धुऊन टाकले. अगदी शेवटी ते स्वित्झर्लंड व माँटे कालरेत राहात होते पण जगप्रवासाची त्यांची ओढ कायम राहिली. बाँडकाळातील त्या दिवसांबाबत मला अजिबात पश्चात्ताप नाही. एरवी हातात बंदुका घेणाऱ्या नायकांना जे जमले नाही ते मी त्यांना हेवा वाटेल अशा पद्धतीने करून दाखवले असे ते समाधानाने सांगत असत.   १९४५ ते १९७० या कालावधीत त्यांनी टीव्हीवर विविध भू्मिका केल्या. बॉण्डपटातील त्यांचा देखणा व रांगडा नरपुंगव प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर दरएक सिनेमानंतर तिकीटबारीवरचे विक्रम मोडून रॉजर मूर सेलिब्रेटी शिखरावर स्थानापन्न झाले. त्यांनी साकारलेल्या बॉण्डपटकाळात इतर सहाही चित्रपट पडले, इतका लोकांच्या मनात त्यांच्याविषयी बॉण्डआदर तयार झाला होता.