‘मर्सल’ या तामिळी चित्रपटाला भाजपकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. चित्रपट हे तामिळनाडू संस्कृती आणि भाषेच्या अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे ‘मर्सल’ चित्रपटाच्याबाबतीत हस्तक्षेप करून तामिळी स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असे ट्विट त्यांनी केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ट्विटरवरूनच राहुल यांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. सध्या ‘मर्सल’ या चित्रपटाला पाठिंबा देणारे लोक मला ‘इंदू सरकार’च्यावेळी पाठिंब्याची गरज असताना शांत होते. हा म्हणजे सोयीस्कर टीकेचा प्रकार झाला. सर, कोणत्याही सिनेमावर बंदी घालण्याला माझा विरोध आहे. तुमचे (काँग्रेसचे) कार्यकर्ते इंदू सरकारला विरोध करत असताना मला तुमच्या पाठिंब्याची गरज होती. परंतु, त्यावेळी तुम्ही शांत राहण्याचा पर्याय निवडलात, याची आठवण करून देत मधुर भांडारकर यांनी राहुल गांधींची एकप्रकारे कोंडी केली. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सर्व चित्रपट निर्मात्यांसाठी महत्त्वाची सूचना, यापुढे फक्त सरकारी धोरणांचे कौतुक करणाऱ्या चित्रपटांनाच परवानगी दिली जाईल. ‘मर्सल’ चित्रपटातील दोन दृश्ये वगळण्याची मागणी भाजपने केली आहे. ‘परासक्ती’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असता तर काय झाले असते असा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला. ‘परासक्ती’ हा तामिळ चित्रपट १९५२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हिंदू धर्मावर भाष्य करण्यात आले होते. यामुळे चित्रपटावर टीकाही झाली होती.

अभिनेता विजयचा ‘मर्सल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील दोन दृश्यांवर भाजपचा आक्षेप आहे. या दृश्यांमुळे जीएसटी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे ती दृश्ये वगळण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष टीएन सौंदरराजन यांनी केली होती.

जीएसटी आणि नोटाबंदीवर टीका केली म्हणून व्यक्ती देशद्रोही ठरत नाही- शत्रुघ्न सिन्हा