सध्या प्रत्येक क्षेत्रात ऑल राऊंडर व्यक्तींची जास्त गरज असते. एकच व्यक्ती जर अनेक कामं करत असेल तर त्या व्यक्तीलाच अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यातही कलाकार त्यांचे कौशल्य प्रत्येक विभागात दाखवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अभिनयाबरोबरच हे कलाकार दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्रात त्यांचा हात आजमवत असून ते सिनेमांमध्ये गाणेही गातात. कलाकारांनी सिनेमात गाणे गावे की नाही हा सध्या वादाचा विषय बनला आहे. यावर गायक अरमान मलिकने आपले मत मांडत, ‘मी कैलाश खेर सरांच्या मताशी सहमत आहे. कलाकारांनी जे त्यांना जमत तेच करावं. अभिनेत्यांना अभिनय जमतो, त्यांनी तोच करावा. गाण्याची जबाबदारी गायकावर सोडावी,’ असे ट्विट केले. या ट्विटमध्ये अरमानने त्याचं मत मांडण्यासाठी सोनाक्षी सिन्हाच्या एका बातमीची जोड दिली होती. त्या बातमीत जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टमध्ये सोनाक्षी परफॉर्म करणार असल्याचं गायक कैलाश खेरला फारसं रुचलं नसल्याचा उल्लेख आहे.

अरमानच्या ट्विटनंतर सोनाक्षीनेही खास शैलीत त्याला उत्तर दिलं. तिनं लिहिलंय की, ‘यशस्वी कलाकार दुसऱ्या कलाकाराला नाउमेद करत नाहीत. उलट अशा कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणत्याही पद्धतीने कला दडपली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.’ एवढंच बोलून ती थांबली नाही तर, अभिनेत्याने फक्त अभिनयच करावा असे जर अरमानचे मत असेल तर त्याने एकदा माझ्याकडे एक गाणं गाण्याची विनंती का केली होती? असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला.

या दोघांच्या या ट्विट वॉरमध्ये अरमानचा भाऊ अमाल मलिकही सहभागी झाला. यानंतर अरमानने आपली बाजू मांडणारे ट्विट केले. ‘मला तुझं म्हणणं पटतं सोनाक्षी, पण आपल्या देशात गायकापेक्षा अभिनेत्यालाच जास्त महत्त्व दिले जाते,’ असे ट्विट अरमानने केले.

सोनाक्षीने केलेल्या दाव्यावर अरमानने पुन्हा एक ट्विट करत म्हटले की, ‘तुला गाणं गाण्याची विनंती मी नाही तर माझा संगीतकार भाऊ अमालने केली होती.’ यावर उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली की, ‘हो मला माहितीये अमाल संगीतकार आहे. पण मला हेही स्पष्ट आठवतं की, एका कार्यक्रमानंतर तुम्ही दोघं माझ्याकडे एक गाणं एकत्र करण्यासाठी विचारायला आला होता?’ सोनाक्षीच्या या ट्विटनंतर अरमानने आणि अमालने कोणतेही ट्विट केले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे सोनाक्षीची दबंगगिरीच जिंकली असे म्हणायचे का?