आपण लहान असताना अनेक स्वप्न पाहतो. जसजसे मोठे होत जातो त्या प्रमाणे आपल्या स्वप्नांतही बदल होत जातात. सुरुवातीला कोणाला शिक्षक व्हायचे असते तर कोणाची डॉक्टर व्हायची इच्छा असते. भविष्यात आपल्यासमोर काय येणार आहे याची पर्वा न करता आपण स्वप्न पाहत जातो. पण मोठेपणी प्रवाहासोबत जात आपण एखादे वेगळेच क्षेत्र करिअर म्हणून निवडतो. फार कमी असतात जे लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांचा अगदी शेवटपर्यंत पाठलाग करतात. आता सोनाक्षी सिन्हाचेच घ्या ना तिला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते. तिला एक अंतराळवीर व्हायचे होते. पण तिच्या नशिबात एक अभिनेत्री होणे होतेच त्यानुसार ती वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून या क्षेत्रात आली आणि स्थिरावलीही.

लहान असताना सोनाक्षी अनेकदा आपल्या आई- वडिलांना मला चंद्रावर जायचे असल्याचे सांगायची. पण नंतर इतरांप्रमाणे तिनेही आपले वेगळे करिअर निवडले. पण आता तिने लहानपणी पाहिलेले अंतराळवीर होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ती एका लघुपटात अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे.

‘डॉटर्स डे’ निमित्ताने सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा एक लघुपट प्रदर्शित करणार आहे. या लघुपटात सोनाक्षी काम करणार आहे. लघुपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी ती वेळेआधीच सेटवर हजर होती. अंतराळवीराची भूमिका साकारताना आपल्याला काय हवे याची छोटेखानी यादीही तिने तयार केली होती. अंतराळवीराचे कपडे घातल्यानंतर तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ‘डॉटर्स डे’निमित्तच्या या लघुपटात सोनाक्षी प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.