गेल्या वर्षी ‘नीरजा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. या सिनेमाने जगभरात १२५ कोटी रुपयांची कमाईही केली होती. या सिनेमाला फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळाली होती. ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा तसेच इतर पुरस्कारांवरही या सिनेमाने आपले नाव कोरले होते. पण आता या सिनेमाच्या नफ्यावरून नीरजाचे कुटुंबिय आणि निर्माते समोरा समोर आले आहेत. ‘सिनेमाच्या नफ्याचा १० टक्के भाग देण्याचे वचन निर्मात्यांनी दिले होते. पण अजूनपर्यंत आम्हाला तो हिस्सा मिळाला नाही,’ असे नीरजाच्या कुटुंबियांनी सांगितले. पण फॉक्स स्टार इंडियामुळे नफ्याचा आकडा कमी झाल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नीरजा भनोटचे कुटुंबिय ‘ब्लिंग एण्टरटेनमेंट’ला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात खेचण्याच्या विचारात आहेत. त्यांनी याबाबत निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.

राम माधवानी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकर या सिनेमाचा सह-निर्माता आहे. मंगळवारी अतुलने सांगितले की, ‘करारानुसार नीरजा सिनेमाला जेवढा नफा झाला आहे, तेवढे पैसे नीरजाच्या कुटुंबियांना आधीच दिले गेले होते, पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत. ब्लिंग अनप्लग्डने नीरजा भनोटच्या कुटुंबियांकडून नीरजावर सिनेमा बनवण्याचे अधिकार मिळवले होते. करारानुसार भनोट आणि ब्लिंग यांच्यामध्ये हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, कुटुंबाला एक ठराविक रक्कम दिली जाईल आणि सिनेमाच्या नफ्यानुसार ठराविक व्हेरिएबल रक्कमही दिली जाईल.’

‘आम्ही एका स्टुडिओबरोबर भागीदारी करणार हे आधीपासूनच स्पष्ट होतं. त्याचप्रमाणे आम्ही फॉक्स स्टारसोबत भागीदारी केली. भनोट कुटुंबियांनाही ही गोष्ट माहिती होती. अनेकवेळा ते स्टुडिओच्या प्रतिनिधिंना भेटलेही होते. सगळे आर्थिक व्यवहार भनोट कुटुंबियांना सांगितले जायचे. त्यामुळेच नफ्यातला वाटा जसा आमच्याकडे आला तसा आम्ही तो त्यांना दिलाही होता. पण भनोट कुटुंबियांनी ती रक्कम घेण्यास मनाई केली होती, पण आता मात्र ते स्टुडिओकडे नफ्याचे पैसे मागत आहेत.’

‘यावर मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. मी तुम्हाला फक्त एवढं सांगू शकते की, आम्ही अन्याय सहन करणार नाही,’ असे नीरजाचा भाऊ अनीश भनोटने सांगितले. याशिवाय अनीशने या प्रकरणाशी निगडीत कोणतीही कायदेशीर माहिती देण्यास नकार दिला.