कलाविश्वामध्ये आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच मॉडेल सोनिका चौहानने तिच्या अनोख्या अंदाजाने अनेकांची मनं जिंकली होती. पण, एका अपघातामध्ये सोनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मॉडेलिंग विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कोलकातामधील एका कार अपघातात सोनिकाचा मृत्यू झाला. ती २८ वर्षांची होती.

‘प्रो कबड्डी लीग’मधून सोनिका सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘प्रो कबड्डी’तील तिच्या सूत्रसंचालनाच्या शैलीने अनेकांची मनं जिंकली होती. याव्यतिरिक्त ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘एनडीटीव्ही २४*७’च्या काही कार्यक्रमांसाठीही तिने सूत्रसंचालन केलं होतं.

एनडीटीव्ही २४*७वर प्रदर्शित झालेल्या टॉक विथ स्टार्स या कार्यक्रमाने सोनिकाला चांगलीच पसंती दिली होती.
सोनिकाला मुळातच क्रीडा क्षेत्रात रस असल्यामुळे तिने ‘प्रो कबड्डी’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती. २०१३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेमध्येही सोनिका सहभागी झाली होती.

तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये असणाऱ्या काही वाहिन्यांपैकी एक असलेल्या ‘चॅनल व्ही’मध्येही सोनिकाने व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं.

सूत्रसंचालन आणि मॉडेलिंगव्यतिरिक्त सोनिका तिच्या मैत्रिणीला व्यवसायातही हातभार लावायची.

मॉडेलिंग, सूत्रसंचालन आणि व्यावसायिक जबाबदारी लिलया पेलणाऱ्या सोनिकाच्या अकाली मृत्युने अनेकांनाच धक्का बसला आहे.