dilip thakurरिमेक हा नवा प्रकार आहे का सांगा? ‘सदियोसे चलता आ रहा है|’ त्यातला एक हुकमी फंडा, दक्षिणेकडील चित्रपटाचा हिंदीत रिमेक. आणि त्यात ‘मास्टर माईंड’ जीतेन्द्र! त्यानेच केवढे तरी तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपट हिंदीत आणले. तुम्हाला कदाचित त्याच्या काही खासियती माहित नसतील. त्या काळात आपला दक्षिणेत जास्त मुक्काम असतो हे पाहून त्याने हैदराबादलाच बंगला बांधला, आणि प्रत्येक शनिवारी दुपारी प्रकाशित होणार्‍या ट्रेड पेपर्सवर त्याचे खास लक्ष असे. त्यातून तिकडे जो प्रादेशिक चित्रपट ‘सुपर हिट’ झाल्याचे दिसून येई त्यावरून हिंदी चित्रपट निर्माण करण्याचा त्याने निर्णय घेतलाच समजा. अनेकदा तर मूळ चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक देखिल त्यासह हिंदीत येई. असाच हा ‘दिलदार'(१९७९). त्याचा निर्माता डी. रामा नायडू दक्षिणेसह हिंदीतही कार्यरत राहिल्याने रिमेकचे प्रमाण कायम राहिले. दिग्दर्शक के. बाप्पय्या व जीतेंद्र ही अनेक चित्रपटांसाठी जमलेली सुपर हिट जोडी. खरं तर बाप्पय्याचे हिंदी बेतास बात. पण आपल्याच चित्रपटाची रिमेक करण्यात त्याचा अडथळा येत नसावा. आणि हिरोचा दिग्दर्शकावर विश्वास असेल तर चित्रपट वेळेत व व्यवस्थित प्रदर्शित होईल ना? रिमेकभोवती किती घटक आहेत बघा. ‘दिलदार’मधे रेखा, नाझनीन, शीतल, शशिकला, देवेन वर्मा, प्रेम चोप्रा, जगदीप, केश्तो मुखर्जी, उर्मिला भट्ट, मारुती, जीवन अशी भली मोठी स्टार कास्ट. अहो सर्वच प्रकारच्या गोष्टी खच्चून भरायच्या हे तर दक्षिणेकडील चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हटल्यावर एवढे कलाकार हवेतच. कथेचे मध्यवर्ती सूत्र अर्थातच सत्याची असत्यावर मात. नायकाची सरशी खलनायकाचा निप्पात. अधेमधे नाच-गाणी-विनोद-मारामारी वगैरे वगैरे हे सगळेच एकमेकांत पेरायचे म्हणजेच चित्रपट अठरा ते वीस रिळांचा होणार. पूर्वी सेन्सॉर प्रमाणपत्रावर रिळे असत. आता वेळ असते. एक रिळ सरासरी दहा मिनिटांचे म्हणजे तीन सव्वातीन तासाचा चित्रपट? होय. हासुध्दा दक्षिणेकडील ‘दिलदार’पणाच. प्रेक्षकांना आकाराने मोठा चित्रपट देऊन खुश करायचे. आणि एकाच तिकिटात एवढा मोठा चित्रपट पाह्यला मिळतोय म्हणून तेही खुश. रिमेकसह हा ‘दिलदार’पणा हिंदीतही आला-रुळला. ( डब ‘बाहुबली’ इतका मोठ्ठा का कळलं? ) जीतेन्द्रच्या प्रगती पुस्तकात रिमेक चित्रपटाचे प्रमाण खूपच मोठे आहे. सत्तर ऐंशीच्या दशकात त्याचा हा ‘दिलदार’पणा हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांनीही त्याच ‘दिलदार’पणे स्वीकारला याला तुम्ही ‘दिलदार’पणे दाद द्यालच…
दिलीप ठाकूर