येत्या २४ तारखेला दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. गुलजार यांची गाणी, विशाल भारद्वाज यांचं संगीत, त्यांचंच दिग्दर्शन, कंगना रणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूरसारखे अभिनेते आणि यूटय़ूबवर आधीच हिट झालेली गाणी या सगळ्यामुळे जाणकार प्रेक्षक ‘रंगून’ची आतुरतेने वाट पाहतो आहे. आपल्या चित्रपटाचं कथानक गुलदस्त्यात ठेवण्यात विशाल भारद्वाज यांना यश आलेलं असलं तरी हा पिरीयड चित्रपट असून तो दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे हे एव्हाना समजलं आहे. त्यामुळे त्या काळात असलेली भारतातली परिस्थिती, स्वातंत्र्य लढय़ाची पार्श्वभूमी, रंगूनवर जपान्यांचं होऊ  घातलेलं आक्रमण, आझाद हिंद सेना हे सगळे तपशील ओघानेच आले.

दुस-या महायुद्धावर आधारित आणि देशातील जवानांशी संबंध असणारा रंगून  हा चित्रपट सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांना दाखविण्यास निर्माते उत्सुक आहेत. सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंब कोलकाता येथे राहत असून त्यांच्यासाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्याची तयारी निर्माते करत आहेत. या चित्रपटात शाहिद, कंगना आणि सैफ यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण पाहावयास मिळणार आहे. यात शाहिद एका कट्टर देशभक्त सैनिकाची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान जम्मू येथील बीएसएफ कॅम्पमधील जवानांशी संवाद साधला होता.

विशाल भारद्वाज यांचा चित्रपट म्हटलं की त्यांचं स्वत:चं वैशिष्टय़पूर्ण संगीत आणि नंतर बराच काळ लोकांच्या ओठांवर रेंगाळत राहणारी गुलजार यांची गाणी हे समीकरण असतं. ‘रंगून’मध्येही ते आहेच. जानेवारीतच यूटय़ूबवर प्रदर्शित झालेल्या त्यातल्या ‘ब्लडी हेल’, ‘टिप्पा’, ‘एक दुनी दो’, ‘ये इश्क है’, ‘अलविदा’, ‘चोरी चोरी’, ‘मेरे पिया गये इंग्लंड’ अशा अरजित सिंग, रेखा भारद्वाज, सुनिधी चौहान यांनी गायलेल्या बारा गाण्यांचे अल्बम चांगलेच उत्सुकता वाढवणारे आहेत.

आपल्या प्रत्येक चित्रपटात स्वत:शीच, स्वत:च्या आधीच्या कामाशीच स्पर्धा करणारा विशाल भारद्वाज हा माणूस दरवेळी जिंकतो आणि आधीच्या कामाच्या कित्येक योजने पुढं निघून जातो. त्यांच्या प्रत्येक चित्रपटगणिक असलेला हा शिरस्ता ‘रंगून’ही पाळेल आणि विशाल भारद्वाजना संगीतकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणखी उंचीवर नेऊन ठेवेल अशीच अपेक्षा आहे.