मराठी रंगभूमीवर नव्या आशयघन नाटकांचा प्रवाह पाहायला मिळतोय. याच प्रवाहात अशोक शिगवण निर्मित विजय निकम लिखित दिग्दर्शित स्पिरीट हे नवं नाटकं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रंगभूमीवर येणार आहे. राजेश देशपांडे, माधवी जुवेकर, संदेश जाधव, संदेश उपशाम, समीर पेणकर, मंगेश साळवी, श्रद्धा मोहिते, रसिका वेंगुर्लेकर, विक्रांत शिंदे. सुमीत सावंत अशी कलाकारांची तगडी फौज स्पिरीट च्या निमित्ताने एकत्र येत मनोरंजनाचा बार उडवणार आहेत.
अभिनेता, दिग्दर्शक आणि मालिकांचे लेखक अशा विविध भूमिकांमधून वावरणारे राजेश देशपांडे, कॅामेडीची बुलेट ट्रेन मधून हास्याचे फवारे उडवणारी माधवी जुवेकर, लक्ष्य मालिकेतील रांगडा पोलीस इन्स्पेक्टर साकारणारा संदेश जाधव आता या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर अभिनयाचं धुमशान घालायला सज्ज झाले आहेत.
“वर्क करणाऱ्या अर्कांच अजब तर्कट” हे तृप्ती प्रोडक्शनच्या अशोक शिगवण या उत्साही निर्मात्याच्या स्पिरीट या नवीन नाटकाचे अत्यंत समर्पक असे वर्णन आहे असे म्हणावयास हरकत नाही. विजय निकम लिखित दिग्दर्शित हे नाटक अनेक अर्थांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवरच्या एका नवीन पर्वाची सुरुवात ठरेल असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
एका धनाढ्य व्यावसायिकाने आपल्या कंपनीला झालेल्या नफ्याचा आनंदोत्सव साजरा करायला सर्व खातेप्रमुखांना आणि अगदी पिऊनसह एका ‘A’ ग्रेड रेस्टॉरंट मध्ये बोलावणं हे फार वैशिष्ट्यपूर्ण नसेल पण उघड होणारा त्याचा या पार्टीमागचा हेतू मात्र चकित करणारा ठरतो. आजची व्यावसायिक मानसिकता आपल्या सर्वांच्या नकळत एका अशा स्तरावर येऊन पोहचली आहे कि कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी हा विषय आपल्या काळजीचा भाग नव्हता असं नव्हे तरीही ज्या तऱ्हेने तो या नाटकात मांडलाय त्यामुळे या विषयाचा छेद घेऊन त्याचा तळ गाठलाय तेही निखळ मनोरंजनाची साथ न सोडता हा मुद्दा मात्र प्रभावित करतो.
असंख्य गोष्टी सूचित करणारे, उपहासगर्भ आणि अर्थपूर्ण असे नाटक म्हणून स्पिरीट कडे पाहता येईल. एक कटू सत्य कुठलीही भाषणबाजी न करता आपल्यासमोर बोलक्या व अर्थपूर्ण संवादातून विजय निकम आपल्यासमोर मांडणार आहेत. या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. परीक्षित भातखंडे यांचं संगीत या नाटकाला लाभलं आहे.
पार्टीमधल्या अर्कांच हे रंजक दर्शन आणि पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांचं भेदक वास्तव घेऊन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनपावलांनी आपल्या भेटीस येणारं हे नाटक आपला वेळ आणि पैसा या दोन्हींचं मूल्य भरभरून देणार आहे आणि मनोरंजनाचं सीमोल्लंघन करणार आहे.