सेलिब्रेटी म्हटलं की प्रत्येक कलाकाराला आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण काळजी घ्यावी लागते. स्वतःच्या लूकबाबत त्यांना पदोपदी सतर्क राहावे लागते. आपल्या आवडत्या कलाकाराला नव्या आणि छान लूकमध्ये पाहायला कोणत्या चाहत्याला आवडणार नाही. त्यामुळे आपल्या चाहत्यांचा बिमोड होऊ नये याची काळजी प्रत्येक कलाकार घेत असतो. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री स्पृहा जोशी हीसुद्धा अशाच काहीशा  विवंचनेत पडली होती. स्पृहाचा लॉस्ट अँड फाऊंड हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये सध्या ती बरीच व्यस्त आहे. त्यातच तिला पुण्यात एका कार्यक्रमाला जायचे होते. या कार्यक्रमात तिला पारंपारिक पण नव्याचं मिश्रण असलेले कपडे परिधान करायचे होते. मात्र, वेळेची कमतरता आणि तिच्या मनासारखे कपडे तिच्याकडे त्यावेळेस नसल्यामुळे तिची बरीच पंचाईत झाली होती. पण, स्पृहाच्या मैत्रिणींनी ऐनवेळी तिला मदत करून तारले. याविषयी स्वतः स्पृहाने फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली.
स्पृहाने फेसबुकवर केलेले पोस्ट
“काल यशवंत नाट्यगृह, पुणे येथे मी आणि कौशल दादाने ‘मैफल’ हा कार्यक्रम केला. संतोष गर्जे या गुणी मित्राच्या ‘बालग्राम’ साठी आमच्याकडून उचललेला हा छोटासा वाटा. कार्यक्रमाला खूपच मजा आली. अनेक दिवसांनी काहीतरी मनस्वीपणे केल्याचं समाधान मिळालं.
कार्यक्रमाचं स्वरूप बघता काहीतरी पारंपरिक पण नव्याचं मिश्रण असलेले कपडे घालावेत असं मनात होतं. पण गेले सात आठ दिवस मी लॉस्ट अँड फाऊंड या आमच्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये अडकली असल्यामुळे तयारीला वेळच मिळाला नाही. पुणे – नाशिक – मुंबई- औरंगाबाद करत अखेरीस काल सकाळी पुण्यात पोचले खरी. पण कपड्यांचं काय, काही सुधरेचना! दमल्यामुळे कुठे नवीन खरेदी करायला जायचीही ताकद नव्हती. ४ वाजायच्या आत कपडे मॅनेज करायचे होते. अशा वेळेस धावून येतात ती खास तुमची माणसं..  सायलीने माझ्या एका फोनवर सगळी जबाबदारी स्वतःकडे घेतली. नीलूच्या अप्रतिम साड्या, रेश्माचे ‪#‎gawaksha‬ चे क्लास क्रॉप टॉप्स, कविताचे परकर, आद्याची ज्वेलरी अशी सगळी सामग्री बघता बघता गोळा झाली. राधिकाने स्वतःच्या कॅनडाच्या फ्लाइटच्या गडबडीतून हे सगळं माझ्यापर्यंत पोचवलं..
कोण करतं हे एवढं?? थॅंक यू म्हटलेलं यापैकी कोणालाच आवडणार नाही.. पण तरी.. कालची ही सगळी धावपळ ही फक्त एका ‘लूक’ पुरती नव्हती. It was all about ‘connecting the souls’ ”
स्पृहाने काही दिवसांपूर्वीच #‎100sareepact‬ अंतर्गत फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. यातला हा दुसरा फोटो आहे.