तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आणि नेत्यांनी आपले दुःख व्यक्त केले. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे मंगळवारी राजकीय सन्मानेने अंत्यसंस्कार करण्यात आले. एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे. ‘अम्मा’चे निधन झाल्याने त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने जयललिता यांच्याशी निगडीत एक आठवण सोशल मीडियावर शेअर केली.

हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा श्रीदेवी बालकलाकार म्हणून काम करायची. बालकलाकार म्हणून तिने आथि परासक्ती या सिनेमात काम केले होते. या सिनेमात तिने मुरुगन देवतेची व्यक्तिरेखा साकारली होती. तर जयललिता यांनी देवी शक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती. श्रीदेवीने याच सिनेमातला एक फोटो शेअर केला आहे. ज्यात श्रीदेवी जयललिता यांच्या मांडीवर बसलेल्या आहे. हा फोटो शेअर करताना श्रीदेवी म्हणाली की, सगळ्यात संस्कारी, शांत आणि हुशार स्त्री. तुमच्यासोबत काम करण्याचे भाग्य मिळाले. मी त्या कोट्यावधी लोकांप्रमाणेच मला तुमची आठवण येते.

एका वृत्तानुसार कंपनीचे एमडी पी.आर.एम.एम. शांताकुमार यांनी सांगितले की, जयललिता यांच्यासाठी बनवलेल्या शवपेटीला अतीथंड ठेवण्यात आले होते. शवपेटीतले तापमान ० ते पाच अंश सेल्सियस एवढे ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्या पेटीतील शव दोन ते ३ दिवस सुरक्षित राहू शकत होते. याशिवाय शवपेटीच्या बाहेरील भाग हा सोन्याने मढवला होता.

६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबररोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना जयललिता यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर अपोलो रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ज्ञ आणि अन्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.